बारावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या मिरजेतील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर दहावी परीक्षेचे बैठक क्रमांक देत परीक्षा मंडळाने नवा गोंधळ घातला आहे.  बारावीसाठी मंडळाने ‘एक्स-०’ या सीरिजने सुरू होणारे बठक क्रमांक निर्धारित केले आहेत. पण या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर  ‘एफ-०’ हे दहावी परीक्षेसाठी निर्धारित क्रमांक छापले आहेत. तसेच परीक्षा केंद्रांना दिलेल्या यादीतही या विद्यार्थ्यांची नावे नव्हती, त्यामुळे त्यांची परीक्षाच धोक्यात आली होती. याबाबत तक्रार होताच परीक्षा मंडळाने उत्तरपत्रिकेवर बारकोड वापरण्याच्या सूचना देत वेळ मारून नेली. पण बारकोड लावणे, त्याची नोंद वेगळया परिपत्रकात करणे, तसे संबंधित परीक्षार्थीकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या कालावधीतील किमान १५-२० मिनिटे अवधी दररोज वाया जात आहे.  मुळात ही परीक्षा मंडळाची चूक असताना विद्यार्थ्यांनाच शिक्षा भोगावी लागत आहे.