बारावीच्या गणित आणि रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांमध्ये झालेल्या चुकांचे विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या दोन्ही विषयांचे मिळून ११ गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनाच हे गुण मिळणार आहेत.
बारावीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक दोन आणि सहा मधील दोन उपप्रश्न चुकले होते. हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना ७ गुण मिळणार आहेत. २८ फेब्रुवारीला गणिताची परीक्षा झाली होती. रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतही दोन प्रश्नांमध्ये चुका असल्यामुळे या प्रश्नांचे ४ गुण देण्यात येणार आहेत. ४ मार्चला झालेल्या या परीक्षेत एका प्रश्नात एकक चुकले होते तर दुसऱ्या प्रश्नात नायट्रोअल्केन या शब्दाचे स्पेलिंग चुकले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न समजण्यात अडचण आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या पाश्र्वभूमीवर हे प्रश्न सोडवणाऱ्यांनाही ४ गुण देण्यात येणार असल्याचे राज्यमंडळाने स्पष्ट केले आहे. याबाबत सर्व विभागीय मंडळांना सूचना पाठवण्यात आल्याचे मम्हाणे यांनी सांगितले.
गुण देण्यावरून नवा वाद?
प्रश्नपत्रिकांमध्ये काही वेळा स्पेलिंगमध्ये चुका होतात. या चुका या प्रश्नपत्रिकांचे मुद्रितशोधन न झाल्यामुळे होऊ शकतात. मात्र, भाषा विषयाच्या प्रश्नांव्यतिरिक्त इतर विषयांमध्ये स्पेलिंग चुकल्यामुळे गुण द्यावेत का, याबाबत अभ्यास मंडळातच वाद असल्याचे कळते आहे. परीक्षा सुरू झाल्यावर नियामकांकडून प्रश्नपत्रिकेची पाहणी करून परीक्षा केंद्रांना सूचना कळवल्या जातात. असे असताना विद्यार्थ्यांना प्रश्नाचा अर्थ कळण्यात अडचण येत नसेल तर त्याचे गुण देण्याचा पायंडा पाडावा का, असा वाद आता अभ्यासमंडळात सुरू झाल्याचे कळते आहे. दरम्यान राज्यमंडळाकडून अधिकृत निर्णय येण्यापूर्वीच गुण वाढवून दिल्याचे जाहीर करणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्याचे मम्हाणे यांनी सांगितले.