भारतीय प्रमाणपत्र परीक्षा परिषदे(आयसीएसई)तर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून हा निकाल ९५.२७ टक्के इतका लागला आहे. हा निकाल मागच्या वर्षीच्या तुलनेत ०.१२ टक्के वाढ झाली आहे.
परीक्षेत मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली असून मुलांचा निकाल ९४.१८ टक्के लागला आहे, तर मुलींचा निकाल ९६.५८ टक्के इतका लागला आहे. यंदा या परीक्षेला एकूण ६८ हजार ७२३ विद्यार्थी बसले होते. यात ३७ हजार ५५८ विद्यार्थी तर ३१ हजार १६५ विद्यार्थिनींचा समावेश आहे. परदेशातून यंदा या परीक्षेला २०१ विद्यार्थी बसले होते. यातील १९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर तीन विद्यार्थी नापास झाले आहेत. राज्यात या परीक्षेला १८४७ विद्यार्थी बसले होते. यात ९४१ विद्यार्थी तर ९०६ विद्यार्थिनींचा समावेश होता. यातील ९६.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातही मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ९७.९० टक्के तर मुलांचा निकाल ९५.८६ टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत देशातून दक्षिण विभागाने बाजी मारली असून या विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.३२ टक्के इतका लागला आहे. त्या खालोखाल पश्चिम विभागाचा निकाल ९५.७४ टक्के इतका लागला आहे. परिषदेतर्फे दरवर्षी ४८ विषयांच्या परीक्षा घेतल्या जातात.
संकेतस्थळ हँग
हा निकाल शनिवारी दुपारी ३ वाजता जाहीर झाला मात्र निकाल पाहण्यासाठी देण्यात आलेले http://www.cisce.org हे संकेतस्थळ हँग झाले होते. यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. काही वेळेस संकेतस्थळ सुरू झाले तर सेवा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत होते, तर काही वेळेस साइटचे काम सुरू असल्याचे संदेश येत होते.
आकाशला सर्वाधिक गुण
जुहू येथील जमनाबाई नरसी शाळेतील आकाश दोषी या विद्यार्थ्यांला ९८.८ टक्के गुण मिळाले आहेत. हा विद्यार्थी या परीक्षेत मुंबईतून सर्वाधिक गुण मिळवणारा विद्यार्थी ठरला आहे. तर लीलावतीबाई पोदार इंटरनॅशनल शाळेतील अर्जुन अय्यर याला ९८.२ टक्के गुण मिळाले आहेत.