शेवटच्या टप्प्यात तयारीला वेग कसा आणायचा आणि प्रत्यक्ष परीक्षा कशी द्यायची याची काही तंत्र या भागात आपण पाहणार आहोत. ही पात्रता परीक्षा आहे. त्यामुळे विषयाचे ज्ञान पुरेसं नाही तर चांगले गुण किती मिळवता हे महत्त्वाचं आहे. केवळ गुणांच्या मागे लागायचे नाही, ही भूमिका योग्य असली, तरी स्पर्धा परीक्षेमध्ये गुणांच्या मागे लागूनच यश मिळते आणि ते शक्यही आहे. परीक्षेच्या नेमक्या दिवशी आपण उत्तम दर्जा गाठणं महत्त्वाचं आहे. शेवटच्या या टप्प्यामध्ये आपण परीक्षाकेंद्रित तयारी करूया

अभ्यासाचा शेवटचा टप्पा म्हणजे झालेल्या अभ्यासाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणे. अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात स्वत:च्या नोट्स वापरा.
या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण विचारप्रक्रिया अभ्यासावरच केंद्रित करा. जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करणं, नुसतंच टेन्शन घेणं नाही तर उठता-बसता, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, जेवताना, झोपताना, फिरताना, व्यायाम करताना सहज एकेक विषय डोळ्यासमोर आणून उजळणी करायची.
प्रश्नपत्रिकेच्या रचनेनुसार अभ्यासाच्या रचनेला शेवटच्या टप्प्यात विशेष महत्त्व आहे. प्रश्नाचं स्वरूप पाहून कोणत्या मुद्यांवर भर द्यायचा हे लक्षात येईल. एखाद्या मुद्दय़ावर भर देणं म्हणजे दुसरा मुद्दा ऑप्शनला टाकणं नाही, हेही लक्षात ठेवा.
परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करताना आपला उद्देश आहे आत्मविश्वास मिळवणं! मेंदूला वाटलं पाहिजे की अंगावर येणाऱ्या टीईटी परीक्षेला शिंगावर घ्यायला आपण सज्ज झालोत आणि असं वाटलं तरी मेंदूचं हे नियंत्रण सुटता कामा नये की टीईटी परीक्षेची तयारी अशी पूर्ण कधीच होत नसते.
प्रत्यक्ष परीक्षेला जाताना – लहानपणी आपण परीक्षेला निघताना डबा घेतलास ना, घडय़ाळ कुठे आहे, बसचा पास ठेवलास ना, अशा अनेक सूचना मिळायच्या आणि आपण वैतागायचो. पण प्रत्यक्ष पेपरला पोहोचल्यावर लक्षात येतं रिसिटच विसरलोय. मध्येच पेन संपलं, खोडरबरच गायब झालंय किंवा पेन्सिलचं टोकच तुटलं. मग घाम फुटतो, एकाग्रतेवर परिणाम होतो. टीईटी परीक्षेत मागे पडायला ताण किंवा एकाग्रतेवरचा तेवढा परिणाम पुरेसा आहे. त्यामुळे शुल्लक वाटल्या तरी या सर्व बारीकसारीक तपशिलांची योग्य दक्षता घ्या. अगदी बसण्याची पद्धत, नजर आणि पेपरमधलं योग्य अंतर, पेनवरची पकड या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या.
प्रश्नपत्रिका मिळाल्यावर ती काळजीपूर्वक वाचा. मात्र, त्यात फार वेळही घालवू नका. प्रश्न क्रमांक एक पासूनच प्रश्न सोडवायला सुरुवात केली पाहिजे असे बंधन आपल्यावर नाही. तुमच्यासमोर एक कच्चा कागद ठेवा. प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न पाहून उत्तर पटकन येत असेल तर उत्तराचा पर्याय निवडा अन्यथा कच्चा कागदावर प्रश्नक्रमांक नोंदवून ठेवा आणि पुढच्या प्रश्नांकडे जा. एकही प्रश्न सोडू नका. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंगची पद्धत नसल्यामुळे मार्क कमी होण्याची शक्यता नाही.
प्रश्नपत्रिका वाचल्या वाचल्या आपल्या मनातली प्रतिक्रिया नियंत्रणात असायला हवी. पेपर सोपा वाटला की एकदम उल्हसित, आनंदित होतं, पेपर अवघड वाटला की एकदम निराशा येते. या दोन्ही प्रतिक्रियांवर आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे.
पेपर आपल्याला जसा सोपा किंवा अवघड वाटतो तसा तो सर्वानाच वाटत असणार हे ध्यानात घेऊन शांतपणे पेपर लिहायला घ्या. परीक्षेच्या वेळात विषयापुरते का होईना शांत आणि स्थिर राहा.
या परीक्षेमध्ये वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. शेवटची पाच-सात मिनिटं लिहिलेला पेपर तपासा. पेपरचा दिलेला पूर्ण वेळ वापरावा. अडीच तासांचा पेपर दोन तासांत पूर्ण झाला म्हणून तो लगेच पर्यवेक्षकांकडे देऊन बाहेर पडू नका. आपल्याला १५० मिनिटं दिली आहेत. त्याचा नीट शांत डोक्यानं पूर्ण वापर करण्यात शहाणपणा आहे, हे लक्षात ठेवा.
परीक्षेसाठी सर्वाना  शुभेच्छा.

टीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे असेल
परीक्षा क्रमांक-
१. (१) (२) (३) (४)        १४७ — — — —
२. (१) (२) (३) (४)        १४८ (१) (२) (३) (४)
३. — — — —               १४९ (१) (२) (३) (४)
४. — — — —               १५० (१) (२) (३) (४)