मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी बांधण्यात आलेले आरोग्य केंद्रच विद्यापीठ प्रशासनाच्या अनावस्थेमुळे ‘आजारी’ अवस्थेत आहे. आरोग्य केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि पुरेशा सुविधा नसल्याने ते कुचकामी ठरले आहे. आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेचा प्रश्न चव्हाटय़ावर आणण्यासाठी ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’ने (मनविसे) गुरुवारी केंद्राच्या बाहेरच प्रतिकात्मक आरोग्य केंद्र चालवले.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या हाताला आरोग्य केंद्राची तळमजला धरून तीन मजली इमारत आहे. २०१० मध्ये लाखो रुपयांची वैद्यकीय सामुग्री या केंद्राकरिता घेण्यात आली होती. परंतु, ही सामुग्री वापराविना केंद्राच्या कपाटांमध्ये धूळखात पडून आहे. आरोग्य केंद्रासाठी विद्यापीठ दरवर्षी अर्थसंकल्पात लाखो रुपयांची तरतूद करते. मात्र, प्रशासनाच्या अनास्थेमुळे हे पैसेच वापरले जात नाही. गेली अनेक वर्षे केंद्राच्या इमारतीत विद्यापीठाचे पत्रकारिता, बहि:शाल विभाग असे विविध विभाग चालविले जात आहेत. त्यामुळे, या इमारतीत आरोग्य केंद्र नावालाच उरले आहे. तळमजल्यावरील अध्र्या भागात हे केंद्र कसेबसे चालविले जाते. पण, या ठिकाणी पूर्णवेळ डॉक्टर नसतो. बाहेरून आणलेल्या डॉक्टरांच्या जीवावर दिवसभरात केवळ दोन तासच हे केंद्र चालविले जाते. केंद्राची दुरवस्था पाहता विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा तरी कसा मिळाला असा प्रश्न पडतो, अशी प्रतिक्रिया अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी व्यक्त केली. विद्यापीठात चार वसतिगृहे आहेत. यात ३०० विद्यार्थी राहतात. या शिवाय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मिळून तब्बल हजाराहून अधिक लोक विद्यापीठ परिसरात राहतात. पण, यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले हे आरोग्य केंद्र कुचकामी ठरले आहे, असे मनविसेचे संतोष गांगुर्डे यांनी सांगितले.