भौतिकशास्त्राचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड पुढील वर्षी भारतात होत असल्यामुळे वर्षभर भारत भौतिकशास्त्राची आंतरराष्ट्रीय राजधानी असणार आहे. कझाकस्तानमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पियाडमधून पुढील वर्षीचा झेंडा घेऊन भारतीय संघ मंगळवारी मायदेशी दाखल झाला.
भारतात सध्या रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित या विषयांच्या ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होतो. भारताने १९९८मध्ये सर्वप्रथम भौतिकशास्त्र ऑलिम्पिययाडमध्ये सहभाग घेतला होता. यानंतर देशात ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यासाठी भारत सातत्याने प्रयत्नशील होता. आता २०१५मधील ऑलिम्पियाडचे आयोजन करण्याची संधी मिळाली असून होमी भाभा विज्ञान संस्था आयोजनाची ही जबाबदारी पार पाडणार आहे. या ऑलिम्पियाडमध्ये ८४ हून अधिक देशांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ऑलिम्पियाडच्या विद्वत विभागाची तयारी सुरू झाली असून बारा जणांचे पथक स्पध्रेत विचारण्यासाठीचे प्रश्न तयार करत आहे. तज्ज्ञांची या पथकात आणखी भर पडणार आहे. हे ऑलिम्पियाड ५ ते १२ जुलै २०१५ या कालावधीत पार पडणार आहे.