नैतिकता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा हे यशाचे  मूलभूत आधारस्तंभ असून उद्योजकतेला नवीन आयाम प्राप्त होत असले तरी या आधारस्तंभांना आगामी काळातही पर्याय नाही, असे प्रतिपादन एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी केले. मैसूर रॉयल अ‍ॅकॅडमी (मैरा) स्कूल ऑफ बिझनेसच्या अद्ययावत वास्तूचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी मैसूर रॉयल अ‍ॅकॅडमीच्या संस्थापिका प्रा. शालिनी अर्स, बिझनेस स्कूलचे डीन प्रा. राजीव सिन्हा, सिंगापूरस्थित जागतिक नाणेनिधीच्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख सुनिल शर्मा तसेच अन्य मान्यवर प्राध्यापक उपस्थित होते.
बदलती जागतिक परिस्थिती, उद्योजकतेला असलेला वाव आणि भारतातील एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मैरातर्फे एक बिझनेस स्कूल सुरू करण्यात आले आहे. त्याच्या वास्तूचे उद्घाटन नुकतेच येथे झाले. या वास्तूची उभारणी आर्किटेक्चर पॅराडाईम या नामांकित स्थापत्यविशारद संस्थेने केली असून तरंगते वर्ग, बहुमजली ग्रंथालय, विद्यार्थ्यांना चौकटीबाहेरचा विचार करावयास  चालना देणारी ब्रेकआऊट क्लासरूम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राध्यापक, नामांकित कॉर्पोरेट कंपन्यांशी जोडलेले संबंध अशा वैशिष्टय़ांनी हे स्कूल नटले आहे.