विधान परिषद सभापतींचे राज्य सरकारला आदेश
पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि आंबेडकरी व डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या ‘राडय़ा’ची सखोल चौकशी करण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी सरकारला दिले.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल. मात्र राष्ट्रद्रोही विचारांच्या घोषणा देणारे आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्यांना सहन केले जाणार नाही, अशा इशारा सभागृहनेते एकनाथ खडसे यांनी दिला.
गेल्या आठवडय़ात फर्गसन महाविद्यालयात विद्यार्थी संघटनांमध्ये झालेला वाद आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना झालेल्या धक्काबुक्कीचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा विषय उपस्थित करताना या महाविद्यालायात देशद्रोही घोषणा झालेल्या नसतानाही अभाविपच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यावर जबाव आणून आंबेडकरी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यास सांगतिले. त्यानुसार प्राचार्यानी पोलिसांना पत्र दिले. तसेच आव्हाड यांनाही धक्काबुक्की करण्यात आली असून अभाविप राज्यातील महाविद्यालयांमध्ये एकप्रकारचे दहशतवादी वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप कपिल पाटील, अनंत गाडगीळ, शरद रणपिसे, प्रकाश गजभिये आदी सदस्यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे आणि त्यांच्या नावाच्या घोषणा देणे हा जर देशद्रोह असेल तर आपणही या सभागृहात बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करीत हा देशद्रोह करीत असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जयभीमच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. सभागृहात गदारोळ उडाला. त्यानंतर या प्रकरणाचे चौकशीचे आदेश सभापतींनी दिले.