‘इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’सारख्या (आयआयटी) अग्रगण्य केंद्रीय अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशांकरिता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-मेन्स’ या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. जेईईच्या किंवा सीबीएसईच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.
जेईई-मेन्समधून जेईई-अॅडव्हान्स या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेकरिता विद्यार्थी निवडले जातात. त्यानुसार खुल्या गटाकरिता १०० ही गुणांची कटऑफ आहे. तर इतर मागासवर्गीयांकरिता (ओबीसी) ७०, अनुसूचित जातींकरिता (एससी) ५२ आणि अनुसूचित जमातींकरिता (एसटी) ४८ ही कटऑफ आहे. या नुसार जेईई-अॅडव्हान्सकरिता दोन लाख विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात ओबीसींमधून २७ टक्के (५४ हजार विद्यार्थी), एससीमधून १५ टक्के (३०,००० विद्यार्थी), एसटीतून ७.५टक्के (१५,०००विद्यार्थी) आणि उर्वरित ५०.५ टक्के विद्यार्थी खुल्या गटातून (१,०१,००० विद्यार्थी) निवडण्यात आले आहेत. तर ३ टक्के जागा दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता राखीव आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जेईई-अॅडव्हान्सकरिता २९ एप्रिल ते ४ मे दरम्यान नोंदणी करायची आहे. जेईई-अॅडव्हासच्या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ही परीक्षा २२ मे रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.