‘एनआयटी’सारख्या नामवंत केंद्रीय शिक्षणसंस्थांमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘जेईई-मेन्स’ आणि बारावीच्या एकत्रित गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीने देशभरातील विद्यार्थी चक्रावले आहेत. या गुणवत्ता यादीसाठी वापरण्यात आलेले पर्सेटाईल सूत्र सदोष असल्याचा आरोप करीत विद्यार्थी या विरोधात थेट न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत.
‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’ने (सीबीएसई) नुकतीच ही गुणवत्ता यादी जाहीर केली. जेईई-मेन्स आणि बारावीच्या गुणांना अनुक्रमे ६० व ४० गुणांचे वेटेज देऊन ही गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. त्यातील विविध राज्य शिक्षण मंडळांच्या गुणांच्या समानीकरणासाठी (नॉर्मलायझेशन) विशिष्ट पर्सेटाईल सूत्र अवलंबण्यात आले आहे. मात्र हे सूत्रच सदोष असल्याची तक्रार प्राध्यापकांकडून व विद्यार्थ्यांकडून होत आहे.
या सूत्राने जेईई-मेन्स आणि बारावीच्या परीक्षेत अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय गुणवत्ता यादीत कित्येक पटीने मागे टाकले आहे. दोन्ही परीक्षांमध्ये आपल्या तुलनेत कमी गुण मिळविणारे विद्यार्थी आपल्या पुढे कसे या विचाराने विद्यार्थी चक्रावून गेले आहेत. (पाहा दोन विद्यार्थ्यांच्या गुणांची तुलनात्मक चौकट) असे हजारो विद्यार्थी देशभरात आहेत.
गुणवत्ता यादी अशा पद्धतीने निश्चित करण्याच्या सूत्रावरच विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. हे सूत्र गुणवान विद्यार्थ्यांवर केवळ अन्याय करणारेच नसून अपारदर्शकही आहे, अशा प्रकारे जास्त गुण मिळवूनही आपण मागे पडणार असू तर अभ्यासासाठी मेहनत करायची कशाला असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी एक वर्षांची विश्रांती घेऊन अभ्यास करतात.
या यादीनुसार एनआयटी, आयआयआयटीज आणि अन्य केंद्रीय व अनुदानित तंत्रशिक्षण संस्थांचे प्रवेश होणार आहेत. त्याचबरोबर काही राज्यांनीही या वर्षी याच गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश देण्याचे ठरविले आहे. सदोष गुणवत्ता यादीमुळे विद्यार्थ्यांची या संस्थांमधील प्रवेशाची संधी डावलली जाणार आहे.
जम्मू-काश्मीर शिक्षण मंडळाच्या दोन विद्यार्थ्यांच्या गुणांची तुलना
अर्जुन सुरी
जेईई-मेन्स गुण – भौतिकशास्त्र (३५), रसायनशास्त्र (८५), गणित (५१)
मेन्सचा पर्सेटाईल – ९८.०४.
बारावीचे नॉर्मलायझेशननंतरचे गुण – ९८.८७.
अखिल भारतीय गुणवत्ता क्रमांक – १२,०७७ मुनीत कुमारी
भौतिकशास्त्र (४७), रसायनशास्त्र (८५), गणित (५३)
मेन्सचा पर्सेटाईल – ९८.५५
बारावीचे नॉर्मलायझेशननंतरचे गुण – ९९.२५
अखिल भारतीय गुणवत्ता क्रमांक – १५,६३८
ज्यांनी व्होकेशनल किंवा बायफोकल विषयांना पर्यायी असलेले भाषा विषय निवडले त्यांना चांगलाच फटका बसला. कारण, भाषा विषय स्कोरिंग नसतो. म्हणूनच अकरावी-बारावीला अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी भाषा विषय घेणे टाळावे, असे मत एस. पी. क्लासेसचे प्रा. सुभाष जोशी यांनी व्यक्त केले आहे.