‘पत्रकारिता आणि संज्ञापन विभागा’ची परीक्षा व्हरांडय़ात घेण्याची नामुष्की ओढवल्याने मुंबई विद्यापीठाने तातडीने हालचाल करत इतर महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र नेमून देत विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केली. मात्र, आयत्यावेळेस परीक्षा केंद्रात करण्यात आलेला हा बदल कळविण्याची तसदी न घेतल्याने विद्यापीठाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराचा फटका परीक्षार्थी विद्यार्थ्यांना गुरुवारी बसायचा तो बसलाच.
पत्रकारिता व संज्ञापन अभ्यासक्रमाकरिता लाखो रुपयांचे शुल्क घेणाऱ्या विद्यापीठाला ‘पत्रकारिता आणि संज्ञापन विभागा’ला हा अभ्यासक्रम चालविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे अद्याप जमलेले नाही. त्यामुळे, गेली अनेक वर्षे या विभागाला कलिना येथील आरोग्य केंद्राच्या एका खोलीत घरोबा करून आपला सर्व कारभार चालवावा लागतो आहे. त्यात आता विभागाच्या परीक्षांकरिता केंद्र उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने तुमच्या परीक्षा तुम्हीच घ्या, या विद्यापीठाच्या अजब फतव्यामुळे विभागाला आपल्या परीक्षाही या इमारतीतील व्हरांडय़ात घेण्याची नामुष्की ओढवली होती. विभागाने परीक्षा विभागाला पत्र लिहून आपली अडचण लक्षात आणून दिल्यानंतरही त्याची दखल घेतली गेली नाही. ‘लोकसत्ता’ने हा सावळागोंधळ ७ एप्रिलच्या मुंबई वृत्तांतमध्ये प्रसिद्ध केल्यानंतर कुठे परीक्षा विभागाने आदल्या दिवशी या विभागाला सोमैय्या, हिंदुजा आणि सराफ महाविद्यालयात परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले. मात्र, हा बदल विद्यार्थ्यांपर्यंत कळविण्याची तसदी न घेतल्याने विद्यार्थ्यांचा मनस्ताप काही टळला नाहीच.
विभागाच्या एटीकेटीच्या सुमारे ८० विद्यार्थ्यांची परीक्षा गुरुवारपासून (१० एप्रिल) सुरू झाली. तोपर्यंत परीक्षा विभागातच होणार असेच विद्यार्थ्यांना वाटत होते. विभागाचे कर्मचारी आदल्या दिवशी संध्याकाळी (बुधवारी) बैठक व्यवस्था घेण्यासाठी म्हणून परीक्षा विभागात गेल्यानंतर कुठे हा बदल समजला. तब्बल ६० विद्यार्थ्यांना अन्य महाविद्यालयांमधील परीक्षा केंद्रांवर हलविण्यात आले होते. तर विभागावर १८ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. विभागाने मग सायंकाळी व्हॉट्स अ‍ॅप, विभागाचा सामाईक ई-मेल, दूरध्वनी आदीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेचे बदललेले केंद्र कळविले.
हा सगळा उपद्व्याप केल्यानंतर विभागाला या १८ विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सोय करावी लागली. विद्यापीठाने जागा उपलब्ध करून न दिल्याने अखेर आरोग्य केंद्राच्या मदतीने त्यांच्या कॉन्फरन्स रूममध्ये परीक्षा उरकावी लागली. वारंवार परीक्षा केंद्र, वेळा बदलण्याच्या विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसायचा काही चुकला नाही. त्यामुळे, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या एका विद्यार्थ्यांची परीक्षाही गुरुवारी हुकली.