20 February 2019

News Flash

बारावी पुनर्परीक्षेच्या अर्जासाठी ९ जूनपर्यंत मुदत

परीक्षेचे ऑनलाइन अर्ज उपलब्ध झाले असून ते भरण्यासाठी ९ जूनपर्यंत मुदत आहे.

 

बारावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षाही या वर्षीपासून ऑक्टोबरऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार असून ही परीक्षा ९ ते २९ जुलै या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे ऑनलाइन अर्ज उपलब्ध झाले असून ते भरण्यासाठी ९ जूनपर्यंत मुदत आहे.

अनुत्तीर्ण झालेले आणि श्रेणी सुधार करण्यासाठी पुन्हा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून पुनर्परीक्षा घेण्यात येते. गेल्या वर्षी दहावीची पुनर्परीक्षा ऑक्टोबरऐवजी जुलैमध्ये घेण्यास राज्य मंडळाने सुरुवात केली. त्याचप्रमाणे या वर्षीपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षाही जुलैमध्ये घेण्यात येणार आहे. विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेची परीक्षा ९ ते २९ जुलै या कालावधीत आणि किमान कौशल्याधारित अभ्यासक्रमांची (एमसीव्हीसी) परीक्षा ९ ते २५ जुलै या कालावधीत होणार आहे. नियमित परीक्षेप्रमाणेच ही परीक्षाही एक दिवसाआड घेण्यात येणार आहे. श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०१७ च्या परीक्षेचीही संधी उपलब्ध आहे.परीक्षेचे ऑनलाइन अर्जही उपलब्ध झाले असून ते भरण्यासाठी नियमित शुल्कासह ९ जूनपर्यंत मुदत आहे. विलंब शुल्कासह १० ते १३ जून या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांची शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज भरायचा आहे. जुलैमधील परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना याच वर्षी पुढील अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयांत प्रवेश घेता येणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आणि अर्जाबाबतचे तपशील राज्य मंडळाच्या www.Mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

दहावीच्या निकालाबाबत अधिकृत घोषणा नाही

राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाबाबत सध्या अनेक तारखांची विविध समाज माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र राज्य मंडळाने अद्याप तारीख जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे निवेदन राज्य मंडळातर्फे देण्यात आले आहे.

First Published on May 31, 2016 2:55 am

Web Title: june 9 deadline for the application of the hsc re exam