17 December 2017

News Flash

चिरंतन शिक्षण : शालेय मंत्रिमंडळ, विद्यार्थी स्टोअर्स आणि बरेच काही

रिसोड अकोला मुख्य रस्त्याला लागून पैनगंगा नदीच्या काठावर जिल्हा परिषदेची किनखेडा प्राथमिक शाळा आहे.

महादेव जायभाये | Updated: December 23, 2012 3:14 AM

रिसोड अकोला मुख्य रस्त्याला लागून पैनगंगा नदीच्या काठावर जिल्हा परिषदेची किनखेडा प्राथमिक शाळा आहे. वर्षभर राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे ही शाळा वाशीम जिल्ह्य़ात नावारूपास आली आहे.
शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत व तीन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत वर्षभर विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांतून सर्वागीण विकास घडविला जातो. यापैकी काही महत्त्वाचे उपक्रम पुढे दिले आहेत.
लोकशाही पद्धतीने निवडणूक – शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला पालक मेळावा घेऊन संपूर्ण वर्षांचे नियोजन दिले जाते. वर्षभर कोणी कोणत्या जबाबदारी घ्यावयाच्या यासाठी सर्वप्रथम मुलांचे मंत्रिमंडळ निवडणूक घेऊन तयार केले जाते. राज्याचे मंत्रिमंडळ जसे काम करते त्याप्रमाणे शालेय मंत्रिमंडळाचे काम चालते.
मुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे मुलांना लोकशाही व्यवस्थेचे प्राथमिक धडे मिळतात.
विद्यार्थी स्टोअर्स – शाळा ग्रामीण भागात असल्याने येथे विद्यार्थ्यांना लागणारी शैक्षणिक सामग्री सहज उपलब्ध होत नाही. म्हणून आम्ही शाळेत विद्यार्थी स्टोअर्स नावाचे छोटे दुकान थाटले आहे. यात विद्यार्थ्यांना लागणारी सर्व शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून दिली जाते. हे सर्व साहित्य ना नफा, ना तोटा या तत्त्वावर विकले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच गरजेप्रमाणे वह्य़ा, पेन, पेन्सिल, चित्रकलेचे साहित्य उपलब्ध होते. याची जबाबदारी चौथीतील शाळा विद्यार्थ्यांकडे दिली आहे.
यामुळे छोटय़ा-मोठय़ा वस्तूंसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ व पैसा वाचतो.विद्यार्थी बचत बँक – विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी व बँकेच्या कामकाजाची माहिती व्हावी म्हणून शाळेतच विद्यार्थी बचत बँक स्थापन केली आहे. या बँकेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे खाते उघडले आहे.
विद्यार्थी बँकेत पैसे टाकतात व काढतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बँकेच्या व्यवहाराची चांगली माहिती झाली आहे. या बँकेतर्फे विद्यार्थ्यांना जर विद्यार्थी स्टोअर्समधून एखादी वस्तू विकत घ्यायची असेल आणि त्याच्याकडे पैसे नसतील तर बँकेतर्फे त्याला बिनव्याजी कर्ज दिले जाते. व तो विद्यार्थी त्याच्याकडे पैसे आल्यावर पैसे बँकेत भरतो. शाळेच्या बँकेत दोन ते अडीच हजार रुपये नेहमी असतात.
स्नेहसंमेलन – हा आमच्या शाळेत राबविला जाणारा सर्वात वैशिष्टय़पूर्ण उपक्रम आहे. २६ जानेवारीच्या दिवशी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. हा दिवस आम्ही एखाद्या सणाप्रमाणे साजरा करतो. या दिवशी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धासाठी बक्षिसे दिली जातात. तसेच विद्यार्थीही शाळेला विविध उपयोगी भेट देतात. या स्नेहसंमेलनामुळे मुलांमधील विविध कलागुणांना वाव मिळतो.

कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१. दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७
reshma.murkar@expressindia.com,

First Published on December 23, 2012 3:14 am

Web Title: kinkheda school of panganga in highlight due to various activity
टॅग School