गुणवत्ता, संशोधन, सुविधा अशा सगळ्या निकषांवर मक्तेदारीचा दावा करणाऱ्या मुंबई-पुणे विद्यापीठांना मागे टाकत कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर येथील विद्यापीठांनी नॅकच्या मूल्यांकनात या वर्षी बाजी मारली आहे. या पाचही विद्यापीठांना ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. मात्र, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ राज्यात अव्वल ठरले आहे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काठावर पास होत ‘अ’ श्रेणी मिळवली आहे.top03
आतापर्यंत मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यातील उच्च शिक्षणाचे केंद्रबिंदू समजले जात होते. मात्र, आता नॅशनल अ‍ॅसेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रेडिएशनच्या (नॅक) मूल्यांकनात या विद्यापीठांना ‘अ’ दर्जा गाठण्यात यश आले असले, तरी ही विद्यापीठे इतर विद्यापीठांच्या तुलनेत मागे पडली आहेत. विद्यापीठातील सुविधा, संशोधन, नियमित पात्र शिक्षकांची संख्या, विद्यापीठाचे उपक्रम अशा काही निकषांवर विद्यापीठांचे नॅककडून मूल्यांकन केले जाते. ग्रेड पॉइंटची सरासरी काढून केल्या जाणाऱ्या मूल्यांकनात ३.०१ ते ४ ग्रेड पॉइंट मिळविणाऱ्या विद्यापीठांना ‘अ’ श्रेणी मिळते. २.०१ ते ३ ग्रेड पॉइंट मिळविणाऱ्या विद्यापीठांना ‘ब’ श्रेणी दिली जाते.
 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने ३.१६ ग्रेड पॉइंट मिळवून राज्यात आघाडी घेतली आहे. त्यानंतर औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ३.१४ ग्रेड पॉइंट्स मिळवून दुसरे स्थान मिळविले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ३.०८ ग्रेड पॉइंट मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांची मात्र या वेळी घसरण झाली आहे. मुंबई विद्यापीठ ३.०५ ग्रेड पॉइंट मिळवून चौथ्या क्रमांकावर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काठावर पास होऊन म्हणजेच ३.०१ ग्रेड पॉइंट मिळवून आपली ‘अ’ श्रेणी टिकवली आहे.

नॅकच्या अहवालाचा अर्थ असा की, संशोधन, अध्यापन, शिक्षण याबाबतीत राज्याच्या इतर भागांनी प्रगती केली आहे. गुणवत्तेचे केंद्रसुद्धा इतरत्र सरकते आहे. शिवाजी विद्यापीठाच्या डेटा सेंटर, अ‍ॅकॅडमिक रिसर्च सेंटर, संशोधनातील वाढता आलेख, आयक्यूएसी डॉक्युमेंटेशन सेंटर, विद्यापीठाचे ग्रीन ऑडिट, नो व्हेइकल डे या उपक्रमांचीही नॅकने दखल घेतली आहे.
– डॉ. एन. जे. पवार, शिवाजी विद्यापीठ