मुंबई विद्यापीठाच्या ‘आईस’ या उपक्रमाअंतर्गत येत्या शनिवारी (२३ फेब्रुवारी) ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीचे प्राध्यापक प्रा. क्रिथी रामम्रीथम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.संशोधन आणि अध्ययन क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी प्रत्येक शनिवारी विद्यापीठातर्फे व्याख्यान आयोजित केले जाते. १३ एप्रिलपर्यंत हा उपक्रम चालेल. येत्या शनिवारी ‘स्मार्ट इलेक्ट्रिक ग्रिडस – भविष्य, संधी आणि आव्हाने’ या विषयावर प्रा. रामम्रीथम बोलतील.
प्रा. रामम्रीथम हे आयआयटीच्या विजय व सीता वशी अध्यासनाचे प्रमुख आहेत. ते आयईईई, एसीएस व इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स आणि इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचे सदस्य आहेत. दोन वेळा ते आयबीएमच्या शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मद्रासच्या आयआयटीने त्यांना उत्कृष्ट माजी विद्यार्थी हा पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्याचबरोबर सिडनी विद्यापीठाचा डॉक्टर ऑफ सायन्स हा किताबही त्यांनी मिळविला आहे.
विद्यापीठाच्या विविध विभागांत आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या व्याख्यानांना हजेरी लावता येईल. शनिवारी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या कलिना संकुलातील फिरोजशहा मेहता भवन येथे हे व्याख्यान होईल. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी, त्यांच्या मनातील प्रश्नांना, शंकांना तज्ज्ञांकडून थेट उत्तरे मिळावी आदी उद्देशाने ही व्याख्यानमाला आयोजिण्यात येणार आहे.