उच्च शिक्षण घेण्यामध्ये गोव्यातील महिला अधिक आघाडीवर आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये प्रगत राज्य असणाऱ्या महाराष्ट्राच्या तुलनेत कमी प्रगत असणाऱ्या ईशान्य भारतातील राज्यांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. बिहारमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वात कमी आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालानुसार २०१० – ११ या वर्षांमध्ये देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी  ४१ .५ टक्के महिलांचे प्रमाण आहे. मात्र, २००६ ते २०१० – ११ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये या प्रमाणामध्ये फक्त ०.९५ टक्के वाढ झाली असून २००६ – ०७ मध्ये महिलांचे प्रमाण ४०.५५ टक्के होते. देशामध्ये गोवा राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांचे प्रमाण ६१. २ टक्के असून ते देशात सर्वाधिक आहे. बिहारमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजे ३१. २ टक्के आहे. मात्र, बिहारमध्येदेखील उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत असून पाच वर्षांमध्ये या प्रमाणामध्ये ६.६५ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांचे प्रमाण हे ४३.९ टक्के असून पाच वर्षांमध्ये २.३५ टक्यांनी वाढ झाली आहे. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पाच वर्षांमध्ये या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षांमध्ये नागालँडमध्ये हे प्रमाण सर्वात वाढले असून १०.४९ टक्क्य़ांनी ते वाढले आहे. नागालँडमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांचे प्रमाण ५०.५ टक्के आहे. सिक्किममध्येही ७. ६४ टक्क्य़ांनी वाढ झाली असून ४९.४ टक्के महिला उच्च शिक्षण घेत आहेत. अंदमान निकोबारमध्ये हे प्रमाण ५२ टक्के आहे. मात्र, पाच वर्षांमध्ये त्यात ४. ७१ टक्क्यांनी घट झाली आहे. केरळ, मेघालय, चंदिगढ या राज्यांमध्येही उच्च शिक्षण घेणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी पन्नास टक्क्य़ांहून अधिक महिला आहेत.