शिक्षणक्षेत्रात लौकिकप्राप्त ठरलेल्या ‘लातूर पॅटर्न’ला आता मात्र या पॅटर्नच्या नावाखाली अलिकडे सर्रास होत असलेल्या लुटीमुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे! गेल्या २५ वर्षांपासून दहावी-बारावी परीक्षांच्या निकालात लातूर पॅटर्नने सातत्याने आघाडी घेतली. त्यामुळे हा पॅटर्न सर्वदूर पोहोचला. परंतु आता मात्र विपणन स्पर्धेच्या संघर्षांत स्थानिक व बाहेरच्या विद्यार्थ्यांची प्रचंड लूट होत आहे. ‘बोलणाऱ्याची मातीही विकते, न बोलणाऱ्याचे सोनेही विकत नाही’ याचीच प्रचिती प्रवेशाच्या काळात विद्यार्थी घेत आहेत.
सातारचे कंदी पेढे, कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादर, पैठणची पैठणी प्रसिद्ध होण्यासाठी काही मंडळीनी स्वत:ला झोकून दिले होते. याच धर्तीवर शिक्षणातील ‘लातूर पॅटर्न’साठी काही जणांनी मोठी मेहनत घेतली. मात्र, नव्या ग्राहकांची फसवणूक केली जाते, तसेच काहीसे शिक्षणाच्या बाबतीत लातूरमध्ये घडू लागले आहे. काही नामवंत महाविद्यालयांत प्रवेशासाठी राज्यातूनच नव्हे, तर परप्रांतातून विद्यार्थी लातुरात येतात. अनुदानित तुकडीत प्रवेश न मिळाल्यास विनाअनुदानित तुकडीत प्रवेशासाठी पालकांची धडपड सुरू असते. नेमका याचाच लाभ शिक्षण संस्था उठवत आहेत.
परीक्षेच्या निकालानंतर यशस्वी विद्यार्थी म्हणून हमखास फोटो छापता येतो. महाविद्यालयाचा लाभ न शिकवता शिकवण्याचे श्रेय लाटता येते, ते वेगळेच. ‘का भुललासी वरलिया रंगा’ हे विद्यार्थी व पालकांना नंतर कळते. दररोज परीक्षा, घोकंपट्टी अगदी गुणांची टाकसाळ म्हणजे लातूर पॅटर्न बनला आहे! पालक व विद्यार्थी आकर्षित व्हावा, या साठीची जाहिरातबाजी, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आम्हीच कशी इतरांपेक्षा वेगळी तयारी करून घेतो, हे बिंबविण्याची खास पद्धत अवलंबिली जाते. बालवाडीपासूनच पालकांच्या खिशाला कात्री लावण्याची किमया शिक्षण संस्थाचालकांनी चांगलीच अवगत करून घेतली आहे.
काही महाविद्यालयाची अकरावीच्या वर्गाची प्रवेश मर्यादा १ हजार २०० आहे. अनुदानित तुकडय़ांपेक्षा विनाअनुदानित तुकडय़ा फायद्यात चालतात. शिकवणी वर्ग घेणाऱ्या मंडळींनी महाविद्यालये सुरू केली आहेत. लातूर पॅटर्नचा दावा करणाऱ्यांपेक्षा ती चांगली चालवली जात आहेत. लातूर शहरातील औद्योगिक वसाहतीत आता शिकवणी वर्ग हाच एकमेव ‘उद्योग’ धुमधडाक्यात सुरू आहे. आंध्र, कर्नाटक प्रांतांतून लातुरात बस्तान बसवणाऱ्या शिकवणी वर्गाचे प्रस्थ वाढल्यामुळे स्थानिक व दाक्षिणात्य अशी तेढही वाढते आहे. परीक्षा देण्यापुरता महाविद्यालयात प्रवेश व केवळ शिकवणीवर अवलंबून राहण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. दररोज महाविद्यालयात जावे असे वातावरणच अनेक महाविद्यालयांत आता पाहावयास मिळत नाही. १५० ते २०० विद्यार्थी वर्गात, शिकवणी वर्गातील संख्याही तेवढीच. मात्र, विद्यार्थ्यांचा विश्वास महाविद्यालयापेक्षा शिकवणी वर्गावर अधिक.