सर्व महाविद्यालयांतील प्रवेशही केंद्रीय पद्धतीने
राज्यात पहिल्यांदाच होणाऱ्या विधी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) स्वरूप अखेरीस उच्च शिक्षण विभागाने जाहीर केले असून यासाठी दीडशे गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील महाविद्यालयांचे प्रवेशही केंद्रीय पद्धतीने करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत पारंपरिक अभ्यासक्रमांप्रमाणेच राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे महाविद्यालयाच्या पातळीवर करण्यात येत होते. मात्र आता राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे प्रवेशही सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून करण्याचे शासनाने जाहीर केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१६-१७) नव्याने स्थापन करण्यात आलेल्या प्रवेश नियमन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही परीक्षा होणार आहे. बारावीनंतर करण्यात येणारा अभ्यासक्रम (बीएसएल) आणि पदवीनंतर करण्यात येणारा अभ्यासक्रम (एलएलबी) या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया घेण्यात येणार आहे. या परीक्षेत दोन तासांत दीडशे गुणांचे बहुपर्यायी प्रश्न सोडवावे लागणार आहेत. पदवीनंतरचा अभ्यासक्रम आणि बारावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेसाठी गणित विषयाचाही समावेश आहे. या परीक्षेसाठी नकारात्मक गुणांकन नाही. या परीक्षेत किमान ३५ टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. विनाअनुदानित महाविद्यालयांसह सर्व विधी महाविद्यालयांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्यात येणार आहेत. परीक्षेच्या स्वरूपाचा आणि प्रवेश प्रक्रियेचा मसुदा उच्च शिक्षण विभागाच्या http://www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याबाबत सूचना किंवा आक्षेप असल्यास mavi.dhepune@nic.in यावर ईमेल करायचे आहेत.

तयारी कधी करायची?
राज्यात पहिल्यांदाच विधी अभ्यासक्रमासाठी परीक्षा होत आहे. मात्र त्यामध्ये समावेश करण्यात आलेल्या ‘लिगल रिझनिंग’ या विषयातील प्रश्नांचे स्वरूप कसे असेल याबाबत अजूनही संदिग्धताच आहे. कोणत्याही प्रवेश परीक्षेचे तपशील वर्षभर आधी विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित असताना अद्यापही या परीक्षेची तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी कशी करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दीडशे गुणांची विभागणी
विषय एलएलबी
लिगल रिझनिंग ४० गुण चालू घडामोडी
आणि सामान्य ज्ञान ५० गुण
लॉजिकल रिझनिंग ४० गुण
इंग्रजी २० गुण
गणित २० गुण