आर्थिकदृष्टय़ा दुर्बल समाजातील लोकांना पुस्तके उपलब्ध करून देऊन त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘अक्षर सरिता फाऊंडेशन’ या संस्थेने ‘वस्ती तेथे वाचनालय’ हा उपक्रम हाती घेतला आहे. लेखिका शोभा बोंद्रे, ‘दूरदर्शन’-मुंबई केंद्राच्या मराठी वृत्तविभागाच्या माजी संचालक विजया जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्यात गोसावी वस्तीमध्ये असे वाचनालय सुरू केले आहे. येथे मिळालेल्या प्रतिसादामुळे आता राज्याच्या वेगवेगळ्या गावांमधील अशा वस्त्यांमध्ये हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.
मुंबईत हनुमान नगर येथे तीन ते चार वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू केला होता. येथे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता आपण पुण्यात गेल्यामुळे तेथेही अशा प्रकारचे काम सुरू करण्याचे ठरविले. ‘भाजप’चे उज्जवल केसकर यांचे सहकार्य या उपक्रमासाठी मिळाले. यंदाच्या जानेवारी महिन्यात उपक्रमास दोन वर्षे पूर्ण झाल्याचे सांगून बोंद्रे म्हणाल्या की, या गोसावी वस्तीतील जवळपास साडेचारशे लहान मुले आणि ५० मोठी माणसे या वाचनालयाचा लाभ घेत आहेत. या मंडळींकडून कोणतेही शुल्क न आकारता आम्ही त्यांना ही पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. यात कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, व्यक्तिमत्व विकास अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. ही पुस्तके आम्ही त्यांना घरी न्यायला देतो.त्यामुळे  या वस्तीतील पालकांना वाचनाचे महत्व कळले आहे, असे बोंद्रे म्हणाल्या.
अशा वस्त्यांमध्ये ‘फिरते वाचनालय’ सुरू करण्याचा आमचा विचार आहे. ठराविक दिवशी पुस्तकांची गाडी त्या त्या वस्तीत जाईल आणि लोकांना पुस्तके उपलब्ध करून दिली जातील,असेही त्यांनी सांगितले.