महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. शाळानिहाय निकालाची आकडेवारी प्रसिद्ध करताना मंडळाने या विद्यार्थ्यांची आकडेवारी नापासांमध्ये टाकल्यामुळे अनेक शाळांचे निकालही घसरल्याने शाळांमध्येही नाराजी आहे. गंभीर बाब म्हणजे खुद्द शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांची निकाल लावण्याची घाई हीच या सर्व गोंधळाच्या मुळाशी असल्याचे समजते. मंडळाची मंगळवारी निकाल जाहीर करण्याची तयारी नसतानाही मंत्र्यांच्या आदेशामुळे निकाल जाहीर करावा लागला आणि हा गोंधळ उडाला.
मंडळातर्फे विविध कारणांमुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. एकटय़ा मुंबई विभागात किमान १५०० विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आल्याचे मंडळाने अधिकृतपणे सांगितले असले तरी मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार ही संख्या जास्त आहे. निकाल न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांनी शाळांकडे धाव घेतली पण शाळेलाही मंडळाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे सांत्वन करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता.
मंडळातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या शाळानिहाय आकडेवारीमध्ये निकाल राखून ठेवलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी नापासांमध्ये धरली आहे. मंडळाच्या या गलथान कारभाराचा फटका वर्षांनुवर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या अनेक शाळांनाही बसला आहे. अंधेरी येथील हंसराज मोरारजी हायस्कूलमधील सात विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्यामुळे या शाळेच्या निकालावर परिणाम झाल्याचे शाळेचे शिक्षक उदय नरे यांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत त्यांना किमान ८० टक्के मिळणे शाळेला अपेक्षित होते, असेही ते म्हणाले.
मंडळाने पूर्व यादी आणि प्रवेशपत्रांमध्ये जो गोंधळ घातला यामुळे हा गोंधळ झाल्याचे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी स्पष्ट केले. शाळांकडून यंदा अंतर्गत गुण येण्यास उशीर झाल्यामुळे तसेच श्रेणी विषयांच्या श्रेणी मंडळाला वेळेवर न कळल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आल्याचे मुंबई विभागाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी स्पष्ट केले. 
मंत्र्यांची घाई ठरली चुकांची आई..
मंगळवार, १७ जून रोजी निकाल लावण्यासाठी मंडळाची संपूर्ण तयारी झालेली नसतानाही मंत्र्यांनी घाई केल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे मंडळातील सूत्रांकडून समजते. मंडळाचे जे काम सुरू होते त्यानुसार मंडळ २० जून रोजी निकाल लावण्यास तयार होते. मात्र मागच्यावर्षी ७ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला होता. यंदा १० जून उलटून गेली तरी निकाल न लागल्यामुळे मंत्र्यांवर विविध स्तरावरून दबाव येत होता. यामुळे त्यांनी १७ जून ही दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आणि मंडळाची तारांबळ उडाली.

राज्याचा दहावीचा निकाल ८८.३२ टक्के
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, तो गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक असल्याने आता अकरावीच्या प्रवेशाची स्पर्धा शिगेला पोहोचणार आहे. उत्तीर्णाच्या संख्येबरोबरच विशेष श्रेणीतील आणि प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांचीही संख्या वाढल्यामुळे महाविद्यालयांचे कट ऑफ वाढणार आहेत.
राज्याचा दहावीचा निकाल ८८.३२ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीचा निकालही या वर्षी घसघशीत लागला आहे. यावर्षी राज्यात १५ लाख ४९ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख ६८ हजार ७९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८८.३२ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पाच टक्क्य़ांनी निकालात वाढ झाली आहे. –

आता ‘परीक्षा’ अकरावी प्रवेशासाठी
मुंबई : दहावीच्या परीक्षेत गुणांच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झाल्याने यंदा अकरावी प्रवेशासाठी मुंबईतील विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक मागणी असलेल्या विज्ञान, वाणिज्य या अभ्यासक्रमांबरोबरच काही ठरावीक महाविद्यालयांमधील कला शाखेच्या प्रवेशासाठीही विद्यार्थ्यांना मोठय़ा स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.
मुंबईतील ११,५०९ विद्यार्थ्यांना यंदा ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळाले. ही संख्या पाहता यंदा अकरावीची कटऑफ चांगलीच वर जाणार आहे. कारण जेव्हा गुणांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे, तेव्हा मुंबईतील नामवंत महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये वाढ झाली आहे.
‘गुणांच्या टक्केवारीचे प्रमाण पाहता यंदाची कटऑफ काही गुणांनी निश्चितपणे वाढेल. अर्थात विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठे असणार आहे, त्यावर ती कुठल्या शाखेत वाढेल ते समजेल,’ असे रूपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य तुषार देसाई यांनी सांगितले.

आनंदवनाचे ९७ खणी यश
मुंबई : दहावीच्या परीक्षेत आनंदवनातील दृष्टीहीन आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांनीही नेत्रदीपक यश मिळविले आहे. आनंदवनातील ३६ विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल एकूण ९७ टक्के आहे. कर्णबधीर असलेल्या १६ पैकी १४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याची कामगिरी बजावली आहे. यात एका विद्यार्थ्यांने सर्वाधिक ७२ टक्के गुण मिळविले आहेत. दोघा विद्यार्थ्यांची प्रथम श्रेणी मात्र थोडक्यात हुकली. येथून २० दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ जण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

चिन्मयी मटांगेचे उल्लेखनीय यश
रत्नागिरीतल्या पटवर्धन हायस्कूलची चिन्मयी मटांगे या विद्यार्थीनीने दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४९६ (९९.२ टक्के) गुण मिळविले आहेत. संस्कृत, गणित आणि विज्ञान या तीन विषयांमध्ये तिने १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.