औरंगाबादच्या ‘क्रीडा -भारती’ या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’शी संबंधित असलेल्या संघटनेने सूचना करताच आपल्या ६५० महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्काराचे सत्र राबवण्याचा फतवाच मुंबई विद्यापीठाने काढला आहे.
इतकेच नव्हे तर सूर्यनमस्कारांचे हे सत्र विवेकानंद यांच्या जयंतीपासून ते २६ जानेवारीपर्यंत असावे असेही या फतव्यात स्पष्ट करण्यात आले आहे. त्या करिता विद्यार्थ्यांकडून पुरेसा सरावही महाविद्यालयांना करवून घ्यावयाचा आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थी कल्याण विभागाच्या भागात या संबंधातील पत्रव्यवहार जाहीर करत विद्यापीठाने आपल्या महाविद्यालयांना अप्रत्यक्षपणे ही सूचना केली आहे.
या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना त्यांच्या विद्यार्थी संघटनेच्या नेत्याने महाविद्यालयात मोबाईल बंदी घालण्याची मागणी केली होती. तेव्हाही असेच परिपत्रक या विद्यापीठाने महाविद्यालयांना बजावले होते.
मात्र, ही बंदी व्यावहारिक नसल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच विद्यार्थ्यांपेक्षाही शिक्षक आणि प्राचार्यानी त्याला विरोध केल्यामुळे हे परिपत्रक बासनात पडून राहिले.
आता ‘नवी विटी, नवे राज्य’ याप्रमाणे विद्यापीठाचा अजेंडाही बदलला आहे. या वृत्तीमुळे एखाद्या संघटनेचा किंवा संस्थेचा वैचारिक, सामाजिक किंवा राजकीय अजेंडा विद्यापीठात किंवा शाळेत राबविणे आता फारच सोपे झाल्याची भावना विद्यापीठ वर्तुळात व्यक्त होते आहे.
या परिपत्रकाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे आदेश कारणीभूत ठरले आहेत. ‘क्रीडा -भारती’ने २६ नोव्हेंबरला या संदर्भात विभागाला पत्र लिहिले होते. त्यावर कार्यवाही करताना विभागाने शिक्षण संचालकांमार्फत सर्व विद्यापीठाच्या कुलसचिवांना अंमलबाजवणीच्या सूचना केल्या आहेत.
त्यानुसार १२ ते २६ जानेवारी दरम्यान स्वामी विवेकानंद जयंती, जागतिक सूर्यनमस्कार दिन रथसप्तमी साजरी करण्याच्या उद्देशाने सूर्यनमस्कार प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचा उपक्रम आयोजिण्याचे आदेश देण्यात आले आहेत.