राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता उंचावण्याकरिता आणि शिक्षकांना प्रोत्साहित करण्याकरिता अहमदाबादच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) या व्यवस्थापन अभ्यासक्रमातील देशातील अग्रगण्य संस्थेची मदत घेण्यात येणार आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आयआयएमशी हा करार केला आहे. त्याचबरोबर बंगळुरू येथील ‘अगस्त्य फाऊंडेशन’च्या मदतीने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील सुमारे एक हजार शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. या सर्व प्रशिक्षणाचा खर्च इन्फोसिस फाऊंडेशन उचलणार आहे. येत्या तीन वर्षांत हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाईल.
राज्याच्या एमएससीईआरटीचे संचालक एन. के. जरग आणि राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांनी या दोन्ही करारावर सह्य़ा केल्या. बुधवारी या विभागाचे मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. अगस्त्य फाऊंडेशनचे किरण अडवाणी आणि आयआयएमचे अविनाश भंडारी यावेळी उपस्थित होते.
अगस्त्य फाऊंडेशनच्या वतीने हैदराबाद येथील विज्ञान केंद्रात शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रकारचे केंद्र एमएससीईआरटीच्या पुणे येथील कार्यालयातही उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात विज्ञानविषयक जाणीवजागृती करण्याकरिता फिरती प्रयोगशाळा उभारणे हा देखील या कराराचा एक भाग असणार आहे.
आयआयएमच्या मदतीने शिक्षकांना नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्याकरिता प्रशिक्षण देऊन त्यांच्या नोंदी ठेवणे, राज्यस्तरावर त्याची गुणवत्ता व उयोगिता तपासणे, पोर्टल तयार करणे, शिक्षकांचे जाळे तयार करणे, नावीन्यपूर्ण उपक्रमांना व्यापक प्रमाणावर प्रसिध्दी देऊन शिक्षकांना प्रोत्साहित करणे व काही उपक्रमांचे धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची राज्यभर अंमलबावणी करण्यात येणार आहे.