राज्यातील जवळपास ५० हजार शालेय शिक्षकांना एकाच वेळी प्रशिक्षण देण्याचा प्रयोग शालेय शिक्षण विभाग राबवत आहे. ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोमवारपासून पुढे आठवडाभर हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. मात्र, या प्रशिक्षणासाठी तांत्रिकदृष्टय़ा सर्व केंद्र सक्षम आहेत का याबाबत शिक्षण विभागातील अधिकारीच साशंक आहेत.
या वर्षी राज्यातील पाचवीचा अभ्यासक्रम बदलला आहे. राज्यभरात ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून एकाच वेळी ५० हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. विळ्या भोपळ्याचे सख्य असलेले महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि बालभारती या संस्था एकत्र येऊन हा उपक्रम राबवत आहेत. अभ्यासक्रम, रचनावाद, अध्यापन पद्धती यावर परिषदेकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तर पाठय़पुस्तकातील घटकांवर बालभारतीकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी आयआयटी आणि अमृता विद्यापीठाने तयार केलेल्या ‘ए-व्ह्य़ू’ या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. शिक्षकांना प्रशिक्षकांशी संवादही साधता येणार आहे. या प्रशिक्षणासाठी ८०० केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
‘प्रशिक्षणासाठी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी संपर्कात अडचणी निर्माण झाल्या, तर त्या ठिकाणी डीव्हीडीच्या माध्यमातून शिक्षकांना व्याख्यान ऐकवण्यात येणार आहे. डीव्हीडी चालण्यात अडचणी आल्या किंवा वीज गेली तर प्रत्येक केंद्रावर एका सुलभकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, त्यांच्या मार्फत प्रशिक्षण पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्राला जनरेटर किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे. अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येत आहे, असे परिषदेचे संचालक एन. के. जरग यांनी सांगितले.