कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक थांबून महिलांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी २०११ मध्ये झालेल्या कायद्याचा आब महाविद्यालयांमध्येही राखला जात नसल्याचे विदारक चित्र पुढे आले. महिला सहकर्मचाऱ्याची लैंगिक छळवणूक होत असल्याचे सिद्ध होऊनही संबंधित पुरूष कर्मचाऱ्याला पाठिशी घालण्याचे प्रयत्न व्यवस्थापनाकडून सुरू असल्याबद्दल वांद्रयाच्या ‘एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चर’ या प्रतिष्ठित महाविद्यालयाची संलग्नता रद्द करण्याच्या कारवाईचा कठोर बडगा मुंबई विद्यापीठाला उचलावा लागणार  आहे.
संबंधित पुरूष कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचे आदेश ‘विशाखा मार्गदर्शक तत्त्वां’नुसार काम करणाऱ्या विद्यापीठाच्या ‘महिला तक्रार निवारण समिती’ने म्हणजे ‘महिला विकास कक्षा’ने दिले होते. मात्र, समितीने वारंवार पत्र पाठवूनही महाविद्यालयाने त्याची दखल घेतली नाही. उलट पीडित महिलेसोबत तिच्या बाजूने साक्ष देणाऱ्यांनाच महाविद्यालयाने कोणती ना कोणती कारणे देत कामावरून काढून टाकले आहे.
या महिलेने संबंधित कर्मचाऱ्याविरोधात डिसेंबर, २०११मध्ये लैंगिक छळवणुकीची तक्रार कक्षाकडे दाखल केली होती. या तक्रारीनंतर महाविद्यालयाने सुरुवातीला आम्हीच या प्रकरणाची चौकशी करतो, असे कक्षाला सांगितले. परंतु, महाविद्यालयीन स्तरावर सुरू असलेली चौकशी एकतर्फी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कक्षाने आपल्या स्तरावर या प्रकरणाची चौकशी सुरू केली. संबंधित महिला, तिचे सहकर्मचारी, आरोपी यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर पीडीत महिलेच्या तक्रारीत तथ्य असल्याचे सिद्ध झाले. कक्षाने संबंधित व्यक्तीला कामावरून काढून टाकण्याचे आदेश महाविद्यालयाच्या प्रशासनाला दिले. मात्र, महाविद्यालयाने या आदेशाच्या अंमलबजावणीची टाळाटाळ केल्याने कक्षाने संबंधित महाविद्यालयाची संलग्नता रद्द करण्यासंदर्भात विद्यापीठाच्या संलग्नता व मान्यता विभागाला कळविले. या संदर्भात कक्षाच्या अध्यक्ष क्रांती जेजुरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहितीला दुजोरा दिला.
विभागाने त्यानुसार २ सप्टेंबरला महाविद्यालयाला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवून ‘संलग्नता का रद्द करू नये’, अशी विचारणा केली होती. मात्र, विद्यापीठाच्या या पत्राला महाविद्यालयाकडून अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे, या महाविद्यालयाची संलग्नता रद्द करण्याचा विचार विद्यापीठ स्तरावर सुरू आहे. ४ जानेवारीला विद्यापीठाच्या ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’च्या (बीसीयूडी) बैठकीत या संबंधातील प्रस्ताव चर्चेला येण्याची शक्यता आहे. मंडळाने या बैठकीत संबंधित प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर तो विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यतेकरिता सादर केला जाईल.
या संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद खानोलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ‘आत्ता मी पूजा करीत असून उद्या संपर्क साधा’, असे सांगत संभाषण अर्धवट तोडले. त्यानंतर संबंधित प्रतिनिधीने वारंवार संपर्क साधूनही त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.
महाविद्यालयाची मनमानी
या महिलेने केलेल्या तक्रारीवरून महिला व बालकल्याण विभागामार्फतही संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीतही संबंधित पीडित महिलेल्या बाजूने निकाल देण्यात आला. मात्र, महाविद्यालयाने त्यालाही भीक न घालता आपली मनमानी चालू ठेवली. पीडित महिलेलाही आता महाविद्यालयाने कामावरून दूर केल्याने तिने कक्षाकडे पुन्हा तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे कक्षाने पुन्हा महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री वर्षां गायकवाड यांना पत्र लिहून संबंधित प्रकार लक्षात आणून दिला आहे.