थेट बारावीनंतरच व्यवस्थापन अभ्यासक्रम करण्याची संधी ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’च्या इंदौर कॅम्पसमधील ‘इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट’द्वारे मिळते. त्याविषयी…
व्यवस्थापन शाखेतील शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधनासाठी जागतिक कीर्ती संपादन केलेल्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत प्रवेश मिळावा, अशी इच्छा देशातील हजारो पदवीधरांची असते. या संस्थेत प्रवेश मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखंच. व्यवस्थापन शाखेचं आजच्या काळात खूप महत्त्व आहे, हे नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. वेगवेगळ्या शाखांमध्ये पदवी घेतलेले विद्यार्थी पदव्युत्तर पदवीचा पहिला पर्याय हा व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम ठरवतात.
यामध्ये बीई किंवा एमबीबीएस या पदव्या घेतलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. पदवीनंतर या रॅटरेसमध्ये सामील होण्याऐवजी थेट बारावीनंतरच व्यवस्थापन अभ्यासक्रम करण्याची संधी मिळाली तर सोने पे सुहागा! अशी सोनेरी संधी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या इंदौर कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे.
इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट :
या संस्थेने पाच र्वष कालावधीचा इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट (IPM) मागील शैक्षणिक वर्षांपासून सुरू केला आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्याचे शिक्षण- प्रशिक्षण देऊन उत्कृष्ट दर्जाचे व्यवस्थापकीय नेतृत्व निर्माण व्हावे यादृष्टीने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.

प्रवेशासाठीची अर्हता :

  • खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही शाखेतील बारावीमध्ये आणि दहावीमध्ये ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही विद्याशाखेतील बारावीमध्ये आणि दहावीमध्ये ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
  • ३० जून २०१३ रोजी खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांचे वय २० वर्षांपेक्षा कमी नसावे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांचे वय २२ वर्षांपेक्षा कमी नसावे.
  • ही किमान अर्हता प्राप्त केलेल्या सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत घेण्यात येणारी अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट द्यावी लागेल.
  • ही चाचणी मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, इंदौर आणि हैदराबाद या केंद्रांवर १० मे २०१३ रोजी घेण्यात येईल.

परीक्षेचा पॅटर्न :

  • ही परीक्षा वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेटिव्ह पद्धतीची राहील.
  • परीक्षेचा कालवधी दोन तासांचा राहील.
  • त्यात एकूण १०० प्रश्न विचारले जातील.
  • प्रश्नपत्रिकेत क्वांटिटेटिव्ह अ‍ॅबिलिटी आणि व्हर्बल अ‍ॅबिलिटी यावर प्रश्न विचारले जातील. क्वांटिटेटिव्ह अ‍ॅबिलिटीच्या प्रश्नांना ६० टक्केवेटेज आणि व्हर्बल अ‍ॅबिलिटीच्या प्रश्नांना ४० टक्के वेटेज दिले जाईल.
  • क्वांटिटेटिव्ह अ‍ॅबिलिटीच्या प्रश्नांमध्ये अलजेब्रा, मॉडर्न मॅथेमॅटिक्स, लॉजिकल रिझिनग, जॉमेट्री, डाटा अ‍ॅनालिसिस, अरिथमॉटिक यावर प्रश्न विचारले जातील.
  • व्हर्बल अ‍ॅबिलिटीच्या सेक्शनमध्ये व्हर्बल रिझिनग, रीिडग कॉम्फ्रिहेन्शन, एर्स इन युसेज यावर प्रश्न विचारले जातील.
  • दोन्ही सेक्शनमध्ये पॉझिटिव्ह गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच मुलाखतीसाठी निवडले जाईल.
  • प्रत्येक प्रश्नाला चार गुण राहतील. प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल.
  • अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
  • मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी १८ मे रोजी संस्थेच्या वेबसाइटवर घोषित केली जाईल.
  • मुलाखती २८ मे ते ३१ मे २०१३ या कालावधीत घेण्यात येतील. या मुलाखती मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, इंदौर आणि हैदराबाद या केंद्रांवर घेतल्या जातील.
  • विद्यार्थ्यांची अंतिम निवड ही अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
  • अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टसाठी ६० टक्के आणि मुलाखतीसाठी ४० टक्के वेटेज धरले जाते.
  • प्रवेशसंख्येच्या किमान १० पट संख्येने विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • या अभ्यासक्रमांना १२१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
  • यामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे या अभ्यासक्रमासाठी १५ टक्के जागा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव.
  • ७.५ टक्के जागा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव. २७ टक्के जागा इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांसाठी राखीव.
  • ३ टक्के जागा शारीरिकदृष्टय़ा अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात.
  • १५ जुल २०१३मध्ये प्रत्यक्ष अभ्यासक्रमास प्रारंभ होईल.

गुणवत्तेचे मूल्यमापन

  • या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन दरवर्षी किंवा सत्रनिहाय करण्यात येईल.
  • ज्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन समाधानकारक असेल त्यांनाच पुढील वर्षांत प्रवेश दिला जातो.
  • ज्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन समाधानकारक नसेल त्यांना अभ्यासक्रम सोडून देण्यास सांगण्यात येईल किंवा पुन्हा आधीच्या वर्षीचा अभ्यासक्रम करण्याचा सल्ला दिला जातो.
  • जे विद्यार्थी पाच वर्षांतील सर्व आवश्यक गुणवत्ता प्राप्त करतील, त्यांनाच इंटिग्रेटेड डिप्लोमा इन मॅनेजमेंट ही पदविका प्रदान केली जाईल. (अभ्यासक्रमाच्या नावात डिप्लोमा हा शब्द असला तरी हा अभ्यासक्रम कोणत्याही व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट दर्जाचा आहे.)
  • इंटिग्रेटेड डिप्लोमा इन मॅनेजमेंट ही पदविका प्राप्त करण्यासाठी किमान शैक्षणिक गुणवत्ता काय असावी, याचा निर्णय संस्थेची अकॅडमिक कौन्सिल घेईल.
  • याविषयीची कल्पना पहिल्या सत्राच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना दिली जाईल.

शुल्क :

  • या अभ्यासक्रमासाठी पहिल्या तीन वर्षांसाठीची फी प्रत्येकी ३ लाख रुपये आहे.
  • त्यानंतरच्या दोन वर्षांसाठीची फी प्रत्येकी ५ लाख रुपये आहे. यामध्ये लॉजिंग आणि बोìडगचा खर्च समावेश नाही.
  • पहिल्या तीन वर्षांसाठी दोघांसाठी एक खोली या तत्त्वावर होस्टेल व्यवस्था केली जाते.
  • चौथ्या आणि पाचव्या वर्षांसाठी एका व्यक्तीसाठी एक खोली दिली जाते.
  • फीमध्ये दरवर्षी बदल होत असतो.
  • अभ्यासक्रम हा १५ सत्रांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. प्रत्येक सत्र ३ महिन्यांचे राहील.

अभ्यासक्रमाची रचना :
या अभ्यासक्रमाची रचना वैशिष्टय़पूर्ण अशी असून त्यात व्यवस्थापन शिक्षण आणि सामाजिक शास्त्रे यांची सांगड घालण्यात आली आहे. ४० टक्के वेटेज हे पुढील विषयांवर देण्यात आले आहे. यामध्ये

  • मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, लॉजिक आणि कॉम्प्युटर सायन्स
  • इंट्रॉडक्शन टू पोलिटिकल सायन्स अ‍ॅण्ड लिटरेचर
  • सिव्हिलायझेशन अ‍ॅण्ड हिस्ट्री (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय)
  • एक्सपोजर टू बॉयलॉजिक सायन्सेस
  • एक्सपोजर टू लँग्वेजेस (एक भारतीय आणि एक परकीय)
  • सॉफ्ट स्किल्स- लीडरशिप क्वालिटीज, पर्सनालिटी डेव्हलपमेंट, टीम वर्क आणि लेखी व मौखिक कम्युनिकेशन (संवाद कौशल्य) यांचा समावेश आहे.

(पूर्वार्ध)