उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या लाखो जागा उपलब्ध असून बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची कोणतीही अडचण येणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. तंत्रशिक्षणासाठी तर मागणीपेक्षा जागा अधिक अशी परिस्थिती असल्याने यंदा मागेल त्याला प्रवेश मिळणार आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी, पदविका, फार्मसी पदवी, पदविका, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, एमबीए आदी अनेक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सुमारे तीन लाख ८७ हजार जागा उपलब्ध असून त्यात यंदा सुमारे १८ हजार जागांची भर पडली आहे. विविध अभ्यासक्रमांच्या चार ते साडेचार लाखाहून अधिक जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवेशाची कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले.तंत्रशिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांच्या एक लाख २९ हजाराहून अधिक जागा गेल्यावर्षी रिक्त राहिल्या. त्यात आणखी भर पडल्याने आगामी शैक्षणिक वर्षांत हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.