दहावी आणि बारावी या दोन महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यांवर विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालकांकडून उदंड प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या करिअरविषयक विभागाच्या प्रमुख नीलिमा आपटे यांनी ‘करिअर निवडताना’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर कॉर्पोरेट ट्रेनर गौरी खेर यांनी ‘सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व आणि विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाचा समारोप ‘दहावी-बारावीनंतरचे अभ्यासक्रम आणि करिअर संधी’ या व्याख्यानाने झाला. ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी या विषयाबाबत मार्गदर्शन केले. या तीन तज्ज्ञ वक्त्यांसह ‘विद्यालंकार’च्या गणित विभागाचे प्रमुख हितेश मोरे, संकल्प आयएएस फोरमचे संतोष रोकडे, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे उल्हास माळवदे, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डिपार्टमेंटचे प्रा. रामभाऊ बडोदे, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या रिजनल लीड सेंटर-मुंबईचे संचालक इंद्रनील मयेकर यांनीही विशेष वक्ते म्हणून आपले मनोगत या वेळी व्यक्त केले.

‘पालक-पाल्य संवाद व्हावा’
पालक आणि पाल्यांमध्ये सध्या हरवत चाललेला संवाद पुन्हा प्रस्थापित होणे महत्त्वाचे आहे. पालकांनी आपली मते किंवा अपेक्षा विद्यार्थ्यांवर लादू नयेत. आपल्या पाल्याची क्षमता तपासून आणि ओळखूनच दहावी-बारावीनंतर योग्य त्या विद्याशाखेची निवड करा. भरपूर टक्के मिळाले म्हणून किंवा आपले इतर मित्र, मैत्रिणी विज्ञान शाखेला जातात म्हणून विद्यार्थ्यांनी त्या शाखेचे निवड करू नये. एखाद्या विषयाची नुसती आवड आहे की त्यात करिअर करायचे आहे ते ठरवा. आपल्या स्वत:च्या क्षमतांवर जास्त भर द्या. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून आपली कल चाचणी करून घ्या. अकरावीचे वर्ष म्हणजे आराम असे मानू नका. पहिल्या दिवसापासून अभ्यासाकडे लक्ष द्या म्हणजे पुढे बारावीचा अभ्यास सोपा जाईल.

‘अंगभूत कौशल्ये ओळखा’
विद्यार्थ्यांनी स्वत:मधील अंगभूत कौशल्य आणि गुण ओळखावेत. इतरांशी चांगल्या प्रकारे संवाद साधायला शिका. बाहेरच्या जगात वावरताना आपल्याला प्रसंगी स्वभावाला मुरड घालून किंवा इतरांबरोबर जुळवून घेऊन काम करता आले पाहिजे. १५ ते २१ हे वय आपले शिक्षण, व्यक्तिमत्त्व आणि करिअर घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. तेव्हा अन्य प्रलोभनांकडे न वळता केवळ अभ्यासावरच लक्ष केंद्रित करा. वेळेचे योग्य नियोजन साधा. एखाद्या कार्यशाळेतून व्यक्तिमत्त्व विकास होत नाही तर ती आयुष्यभर चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तेथे होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. अभ्यासाखेरीज अवांतर वाचन करा, संवादकौशल्य वाढवा.

‘रुची पाहून शाखा निवडा’
दहावीपर्यंत जे काही शिकलात त्याचे आवडलेले, मध्यम आवडणारे आणि अजिबात न आवडलेले/न झेपलेले अशा तीन गटात विभागणी करा. न आवडलेले किंवा न झेपलेले विषयांचा अजिबात विचार न करता ते सोडून द्या. ज्या विषयात रुची आहे, ते विषय, विद्याशाखा निवडा. स्वत:तील क्षमता ओळखा. दहावी-बारावीनंतर अनेक पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यात चांगले करिअर होऊ शकते. बारावीनंतरही अनेक व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधी निर्माण, शेती, परदेशी भाषा, वकिली, परिचारिका, तंत्रज्ञ, हॉटेल मॅनेजमेंट, उपयोजित कला आणि इतर विविध अभ्यासक्रम आज उपलब्ध असून त्याची माहिती करून घेऊन निवड करा.