महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा निर्णय
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या परिषद) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची प्रथम भाषा आणि गणित विषयाची ‘संकलित मूल्यमापन-१’ चाचणी आता दिवाळीनंतर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीपासून या चाचण्यांच्या आयोजनात घोळ सुरू झाला असून आता पुन्हा एकदा या चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा आणि गणित या विषयांची पायाभूत चाचणी १४ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत घेण्याचे निश्चित झाले होते.
या कार्यक्रमातील या विषयांची दुसरी चाचणी ‘संकलित मूल्यमापन-१’ ही ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार होती; तथापि आता काही तांत्रिक कारणे पुढे करून ही चाचणी दिवाळीनंतर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते आठवीचे प्रथम भाषा व गणित हे दोन विषय वगळता उर्वरित विषयांसाठी ‘संकलित मूल्यमापन-१’ चाचणी २० ऑगस्ट २०१० च्या शासन निर्णयानुसार आपल्या नियोजनाद्वारे घ्यावी, असेही शाळांना कळविण्यात आले आहे. या चाचण्यांबाबत सुरू असलेल्या घोळामुळे शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी आणि पालकही त्रस्त झाले आहेत.