नऊ जणांना ९९.९९ पर्सेटाईल; यंदाही अव्वल कामगिरी
व्यवस्थापन शास्त्राच्या विविध अभ्यासक्रमांकरिता राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतलेल्या ‘सामाईक प्रवेश परीक्षे’चा (सीईटी) निकाल जाहीर झाला असून नऊ विद्यार्थ्यांनी ९९.९९ पर्सेटाईल मिळवून अव्वल कामगिरी केली आहे.
राज्यभरातून ६९,३१४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एकाही विद्यार्थ्यांला १०० पर्सेटाईल मिळविता आले नाहीत. परीक्षा दिलेल्यांपैकी शून्य गुण मिळविणारे ३५ विद्यार्थी वगळता सर्व परीक्षार्थी व्यवस्थापन शास्त्राच्या एमबीए, एमएमएस अशा विविध अभ्यासक्रमांकरिता प्रवेश पात्र ठरले आहेत.
राहुल नायर, सौरभ नवरत्ने, कुणाल शाह, अमोघ तलवार, जयदीप मेहंदळे, प्रणव कांत, दीपक महासागर, सारंग लाहोटी, गौरव दवे आणि शशांक प्रभू या विद्यार्थ्यांनी १५१ ते १६५ गुणांदरम्यान कमाई करत ९९.९९ पर्सेटाईल मिळविले आहेत. एक गुण मिळवून ०.०५ पर्सेटाईल मिळविणारे आठ विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सीईटीत अव्वल कामगिरी करणारे विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे आहेत. मे महिन्यात सुरू होणाऱ्या ‘केंद्रीय प्रवेश प्रक्रिये’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहेत. . संचालनालयाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना आपल्या गुणांचे पत्र डाऊनलोड करून घेता येईल. यंदा जेबीआयएमएस या मुंबईतील नामांकित शिक्षण संस्थेचे प्रवेशही याच सीईटीतून कॅपच्या माध्यमातून केले जाणार आहेत. गेल्या वर्षी स्वायत्तता मिळाल्याने संस्थेने स्वतंत्रपणे प्रवेश प्रक्रिया राबविली होती. परंतु यंदा ही संस्था पुन्हा कॅपमधूनच प्रवेश करणार आहे.यंदा ६९,३१९ विद्यार्थी प्रवेश पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षी प्रवेश पात्र ठरलेल्या ६०,२९२ विद्यार्थ्यांपैकी ५७,२२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत भाग घेतला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश पात्र ठरलेले विद्यार्थी यंदा जास्त असल्याने प्रवेशासाठी अधिक चुरस असेल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील व्यवस्थापन महाविद्यालये – ३९२
एकूण जागा – ४३,८१०

व्यवस्थापन कोटय़ाच्या प्रवेशांमध्ये पारदर्शकता
ल्ल खासगी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्क व प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी अस्तित्वात आलेल्या नव्या कायद्यानुसार यंदा खासगी महाविद्यालयांमधील व्यवस्थापन कोटय़ातील प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.
ल्ल या विद्यार्थ्यांनाही कॅपमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे राज्याच्या ‘प्रवेश नियंत्रण प्राधिकरणा’अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा’कडे नोंदणी करावी लागणार आहे.
ल्ल हा कक्ष सर्व प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून गुणवत्ता यादी जाहीर करेल. त्यानंतरच विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कोटय़ातून खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. यामुळे व्यवस्थापन कोटय़ाच्या प्रवेशांमध्ये पारदर्शकता येण्याची शक्यता आहे.