वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सीईटीच्या प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नाच्या उत्तरावरून विद्यार्थी आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालय (डीएमईआर) यांच्यात झालेल्या वादावर गुणवाढीचा तोडगा उच्च न्यायालयाने काढला आहे.
आरोग्यशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमासाठी ७ मे रोजी सीईटी घेण्यात आली होती. त्यात प्रश्न क्रमांक १७८च्या उत्तरासाठी देण्यात आलेल्या पर्यायावरून घोळ निर्माण झाला होता. आधी या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक ‘सी’ असल्याचे जाहीर करण्यात आले. डीएमईआरने ५ जून रोजी या प्रश्नाच्या उत्तराचा नेमका पर्याय हा ‘सी’ नव्हे तर ‘बी’ असल्याचे व प्रश्नासाठी ‘सी’ हा पर्याय निवडणाऱ्यांचा एक गुण कमी करण्याचे जाहीर केले होते. डीएमईआरच्या या निर्णयाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती व गुणवाढीची मागणी केली होती.
न्यायमूर्ती अनुप मोहता व न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने या वादावर तोडगा म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नासाठी दोन्हीपैकी एका पर्यायाची निवड केली असेल त्यांना गुणवाढ देण्याचे आदेश डीएमईआरला दिले. त्यामुळे प्रश्न क्रमांक १७८ चे उत्तरासाठी ‘बी’ किंवा ‘सी’चा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना गुणवाढ मिळणार आहे.