प्रत्येक अभ्यासक्रमासाठी नियमानुसार ठेवी न ठेवणाऱ्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांचा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत समावेश न करण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्यामुळे आता अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांना प्रत्येक अभ्यासक्रमासाठी काही रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवावी लागते. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि राज्याचा तंत्रशिक्षण विभाग यांच्या नियमाप्रमाणे ठेवी ठेवाव्या लागतात. या ठेवींचे व्याज संस्थांना मिळत असले, तरी त्यासाठी मोठय़ा संस्थांची कोटय़ाने पैसे अडकतात.
त्यामुळे अनेक संस्था दाखवण्यापुरत्या ठेवी ठेवून त्या नंतर मोडत असल्याचे समोर आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर ज्या संस्थांनी ठेवी ठेवलेल्या नाहीत किंवा मोडल्या आहेत अशा संस्थांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून काढून टाकण्याचा निर्णय तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे.
याबाबत काही शिक्षणसंस्थांनी न्यायालयात याचिका दाखल करून विभागाच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची विनंतीही केली होती. मात्र, न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती आणण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे ठेवी काढून घेणाऱ्या, ठेवींच्या मूळ पावत्या तंत्रशिक्षण विभागाला सादर न करणाऱ्या संस्थांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत तंत्रशिक्षण विभागाकडून संबंधित संस्थांना पत्रेही पाठवण्यात आली आहेत.
यामध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या संस्था सर्वाधिक आहेत. सध्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिली प्रवेश यादी जाहीर होण्यापूर्वी ज्या संस्था ठेवींची रक्कम भरतील, त्यांना प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात येईल, असे तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक दयानंद मेश्राम यांनी सांगितले.