दहावीच्या निकालाची तारीख तोंडावर आली तरी परीक्षेदरम्यान झालेला प्रवेशपत्रांच्या गोंधळाची मालिका संपण्याच्या मार्गावर नाही. या गोंधळामुळे एकच आसनक्रमांक दोन विद्यार्थ्यांना दिला गेला असल्याचा आणखी एक घोळ पुढे येत आहे. यामुळे निकालात गडबड होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीवरून त्यांच्या उत्तरपत्रिकेची ‘ओळख’ पटविण्याचे ‘पोलिसी’ पद्धतीचे काम ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मंडळा’ला करावे लागणार आहे.
सध्या तरी या तक्रारी केवळ मुंबई विभागीय मंडळाकडेच येत आहेत. नेमक्या किती विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असावा हे सांगणे सध्या तरी कठीण असले तरी मुंबईतील विभागीय मंडळाकडील या प्रकारच्या तक्रारींचा ओघ सतत वाढत असल्याची माहिती आहे. अकरावी प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरताना हा घोळ काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. ‘अकरावी ऑनलाईनसाठी अर्ज भरण्यापूर्वी आपला बैठक क्रमांक दिल्यानंतर भलत्याच विद्यार्थ्यांची माहिती संगणकावर खुली होत होती,’ असे एका विद्यार्थ्यांने सांगितले. ‘आपल्याऐवजी भलत्याच कुणाची माहिती समोर आल्याने मी चक्रावून गेलो. शाळेमार्फत हा प्रकार मंडळाच्या लक्षात आणून दिला असून आता मला नव्या आसनक्रमांकाचे प्रवेशपत्र दिले जाणार आहे,’ अशी माहिती या विद्यार्थ्यांने दिली.
विद्यार्थ्यांनी हा गोंधळ शाळेमार्फत मंडळाच्या लक्षात आणून दिल्यानंतर आता तो निस्तरण्याचे काम सुरू आहे. मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी एकच बैठकक्रमांक दोघा विद्यार्थ्यांना दिल्याचे प्रकार काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत झाल्याचे मान्य केले.

उत्तरपत्रिका दाखवून खात्री पटवू
ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा घोळ झाला आहे, त्यांचे जुने ओळखपत्र रद्द करून त्यांना नव्या बैठक क्रमांकाचे नवे ओळखपत्र दिले जाईल. तसेच, त्यांच्या उत्तरपत्रिकेची ‘ओळख’ त्यांच्या स्वाक्षरीच्या नमुन्यावरून पटवून त्या प्रमाणे निकाल जाहीर केले जातील. निकालाविषयी खात्री पटावी यासाठी त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकाही दाखविण्यात येतील.
लक्ष्मीकांत पांडे, अध्यक्ष, मुंबई विभागीय मंडळ

नेमका गोंधळ काय?
कुणाचे प्रवेशपत्रच नाही, असल्यास त्यावर नाव, विषय चुकलेले किंवा छायाचित्र भलत्याचेच अशा चुकांमुळे यंदाची दहावीची परीक्षा चांगलीच गाजते आहे. परीक्षांसाठी ओळखपत्रे तयार करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी भरून दिलेल्या परीक्षा अर्जाचे प्रिटींग करून मग त्यांचे स्कॅनिंग केले जाते. या स्कॅनिंग केलेल्या अर्जाचे ‘प्रोग्रॅमिंग’ होऊन त्यानंतर ओळखपत्र पूर्व-यादी (प्री-लिस्ट) तयार केली जाते. ही यादी नंतर शाळांकडून तपासून घेतली जाते. शाळांनी तपासून सुधारणा केलेली यादी परत शिक्षण मंडळाकडे जाते. या यादीला मंडळाने अंतिम मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्ष ओळखपत्र तयार केले जातात. पण, या वर्षी प्रिटींग आणि स्कॅनिंगचे काम ज्या खासगी संस्थेला देण्यात आले त्यांनी अर्जाचे ‘प्रोग्रॅमिंग’ करताना प्रचंड घोळ घालून ठेवले. त्यामुळे प्री-लिस्ट शाळांकडे यायला उशीर झाला. त्यानंतर प्रवेशपत्रांमध्येही प्रचंड घोळ असल्याचे लक्षात आले. परीक्षा झाल्यानंतर मंडळाने सुधारित प्री -लिस्ट शाळांकडे पाठविली. मात्र, तरीही दहावी परीक्षेचे ‘प्रोग्रॅमिंग’ बिघडलेलेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.