शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे या उद्देशाने ८ जून, १९४८ रोजी कुडूस या आपल्या जन्मगावी पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांनी ‘भारतीय समाज उन्नती मंडळ’ या संस्थेची स्थापना केली. एका छोटय़ाशा झोपडीत लावलेल्या या शिक्षणाच्या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे. संस्थेच्या उल्हासनगर येथील ‘शहाड विभाग हायस्कूल’मध्ये राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाविषयी लिहीत आहेत शाळेच्या शिक्षिका.
शहाडच्या या शाळेत दलित, आदिवासी, शेतमजूर, कामगारांची मुले शिक्षण घेत आहेत. शिक्षण केवळ पुस्तकी राहून चालणार नाही, सामाजिक बांधीलकीचे नातेही शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवे. त्यासाठी शिक्षणाने मनाचीही मशागत करायला हवी. शिक्षकांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिले तर हे सहज साध्य होते. या उद्देशाने शाळेतर्फे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम चालविले जातात.
दत्तक पाल्य योजना – शाळेत सुमारे ५०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी जवळजवळ ९५ टक्के विद्यार्थी मागासवर्गीय समाजातील आहेत. सर्व सुखसोयींपासून वंचित, मिळेल ते काम करून जगणारा, अनेक समस्यांनी ग्रासलेला, रोजच्या जगण्यासाठी परिस्थितीशी झगडणारा, झोपडपट्टीत जगणाऱ्या पालकांच्या या मुलांची शिक्षक घरी जाऊन माहिती घेतात. या मुलांना दत्तक घेतले जाते. त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च या योजनेअंतर्गत केला जातो. यासाठी शिक्षक प्रत्येक महिन्याला पगारातून ठरावीक रक्कम जमा करतात. शिवाय स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाते. त्यातून गणवेश, वह्य़ा, पुस्तके, औषधोपचार आदी खर्च होतो.
पुस्तकमैत्री – संगणक, दूरदर्शन व मोबाइलचा मुलांवर प्रचंड प्रभाव आहे. विद्यार्थी अवांतर वाचन अजिबात करीत नाहीत. त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्यांने खाऊच्या पैशांतून बचत केलेली रक्कम महिनाअखेरीस एकत्र करून त्याची पुस्तके आणली जातात. आतापर्यंत अशी सुमारे दोन हजार पुस्तके जमा करण्यात आली आहेत. प्रत्येक वर्गाचे वाचनमंडळ तसेच वर्गवार वाचनपेटी करून आठवडय़ात वेळापत्रकानुसार पुस्तके वाचावयास दिली जातात. जास्तीतजास्त पुस्तके वाचणाऱ्या मुलांचा पुस्तकमित्र म्हणून गौरव केला जातो. वर्षभरात घेतलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून पुस्तके दिली जातात. पुस्तकमैत्री उपक्रमाअंतर्गत प्रत्येक वर्गाकडून जमा होणाऱ्या पुस्तकांवर प्रत्येक विद्यार्थ्यांचे नाव टाकले जाते.
कवितावाचन, कथाकथन, चित्रपट – नामवंत लेखक, साहित्यिक, कवी, कवयित्रींची माहिती व्हावी म्हणून विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तके, कवितासंग्रह, सीडी उपलब्ध करून दिल्या जातात. या उपक्रमाअंतर्गत बहिणाबाई चौधरी यांच्या कविता, व.पु. काळे, पु.ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांच्या कथाकथनाच्या सीडी ऐकविल्या जातात. त्याचप्रमाणे ‘श्यामची आई’, आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट, मतिमंद मुलांचे भावविश्व उलगडून दाखविणारा ‘आम्ही असू लाडके’, ‘ताऱ्यांचे बेट’ आदी चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविले जातात.
वादविवाद आणि निबंधस्पर्धा – मुलांना स्वत:ला अभिव्यक्त करता यावे यासाठी प्रसारमाध्यमे वा अन्य माध्यमांतून अधोरेखित होणाऱ्या सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांमध्ये वेळोवेळी वादविवाद आणि निबंधस्पर्धा घेतल्या जातात. त्याचबरोबर कर्तृत्ववान महिलांचे जीवनचरित्र संकलित करणे, त्यांच्याविषयी दोन मिनिटे बोलायला लावणे आदी उपक्रमांतून विद्यार्थी या प्रश्नांविषयी सजग राहतात.
शोध नात्याचा – विभक्त कुटुंबपद्धती, आईवडिलाशी संवाद नसणे, दूरचित्रवाणीचा नको इतका प्रभाव यामुळे मुलांचे बालपण भावनाशून्य होत चालले आहे. त्यांच्यात वैफल्य, एकटेपणाची, न्यूनगंडाची भावना, व्यसनाधीनता, गुन्हेगारी लागण होऊ नये म्हणून त्यांनाच पालक मेळाव्यांमधून बोलते केले जाते. नात्यांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले जाते.
-शहाड विभाग हायस्कूल,
उल्हासनगर, ठाणे
कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट,            मुंबई-४०००२१. दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
reshma.murkar@expressindia.com,  reshma181@gmail.com