बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून काही ठरावीक विषयांना लागू करण्यात आलेल्या तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांच्या गुणांच्या खैरातीनंतरही मुंबईच्या निकालात सुधारणा होऊ शकलेली नाही. त्यामुळे, गेल्या वर्षीप्रमाणे मुंबईचा निकाल यंदाही ७६ टक्क्य़ांच्या आसपासच राहिला आहे. मात्र,त्याच वेळी नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर या भागांच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन ते २० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.
मुंबईचा निकाल गेल्या वर्षीच्या ७६.१४ टक्क्य़ांवरून किंचितसा सुधारून ७६.८१ टक्के इतका लागला इतकेच. मात्र ही किंचितशी वाढही फसवीच आहे. कारण, व्होकेशनल शाखा वगळता बारावीच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य या प्रमुख शाखांची कामगिरी निराशाजनक आहे. पण, यापैकी व्होकेशनल वगळता तिन्ही मुख्य शाखांचे निकाल घसरले आहेत.
यंदा भूगोल, गणित या विषयांना पहिल्यांदाच २० टक्के गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा लागू करण्यात आली होती. तर जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तीन विषयांचे प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण २०वरून ३० करण्यात आले. त्यामुळेच नवीन अभ्यासक्रम असूनही विज्ञान शाखेच्या निकालावर फारसा परिणाम झाला नाही. कारण, या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षांच्या वाढलेल्या वेटेजमुळे फायदा झाला. त्यातून सर्व भाषा विषयांकरिताही २० गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात आली होती. तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर दिले जातात. या कारणांमुळे यंदाचा औरंगाबाद विभागाचा निकाल तब्बल १८ टक्क्य़ांनी तर अमरावतीचा २० टक्क्य़ांनी वधारला आहे. निकालातील ही वाढ अनैसर्गिक आहे. पण, या बदलांचा परिणाम मुंबई-पुण्याचा निकालांवर झालेला नाही हे विशेष.
बारावीच्या परीक्षेला मुंबई शहर, उपनगर, रायगड, ठाणे हा भाग मुंबई विभागीय मंडळाच्या अखत्यारित येतो. या भागातून तब्बल २,६६,४४९ विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी २,०४,६५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुंबईचे निकाल
व्होकेशनल:    ९५.९०%    (९५.०१%)
विज्ञान :        ८७.५५%    (८७.८५%)
वाणिज्य :       ७३.१६%    (७१.४०%)
कला :            ६७.२५%    (६९.३५%)
(कंसातील आकडे गेल्या वर्षीची टक्केवारी दर्शवतात)