17 November 2017

News Flash

देशभरात अभियांत्रिकीच्या ६०पेक्षा अधिक प्रवेश परीक्षा

पुढील वर्षी अखिल भारतीय स्तरावरील आणि राज्य स्तरावरील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या तारखा घोषित झाल्या

प्रतिनिधी, नागपूर | Updated: January 2, 2013 3:26 AM

पुढील वर्षी अखिल भारतीय स्तरावरील आणि राज्य स्तरावरील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या तारखा घोषित झाल्या असून बहुतेक प्रवेश परीक्षा मे-जूनमध्ये होऊ घातल्या आहेत. महाराष्ट्रासाठी होऊ घातलेली एमएचटी-सीईटी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात होऊ घातली आहे. काही परीक्षांच्या निश्चित तारखा घोषित करण्यात आल्या असून काहींच्या बाबतीत अंदाजे तारीख घोषित करण्यात आल्या आहेत.
देशभरातून जवळपास ६० ठिकाणी प्रवेश दिले जाणार असून त्यातील २० संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाणार नाहीत. त्यामध्ये जेईई मुख्य, जेईई अॅडव्हान्स, एआयईईई, बीटसॅट, आयसॅटसह त्या त्या राज्यांमधीलमधील अभियांत्रिकीचे प्रवेश निश्चित करणाऱ्या परीक्षा महत्त्वाच्या मानल्या जातात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात दरवर्षी एमएचटी-सीईटी देऊन लाखो विद्यार्थी अभियांत्रिकी, मेडिकल, औषधनिर्माणशास्त्र शाखांमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रवेश निश्चित करतात.
जेईई अॅडव्हान्स प्रवेश परीक्षेतील रँकिंगद्वारे विविध शहरांतील आयआयटीचे प्रवेश निश्चित होणार आहेत तर काही ठिकाणी एआयईईईमधील विद्यार्थ्यांच्या रँकिंग विचारात घेऊन प्रवेश दिले जाणार आहेत.
‘जेईई मुख्य’ ऑफलाईन परीक्षा ७ एप्रिलला तर ऑनलाईन ८ ते ३० एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आली असून अर्ज नोंदणी ८ नोव्हेंबर २०१२पासून सुरू झालेली आहे. जेईई मुख्य परीक्षेनंतर जेईई अॅडव्हान्स दोन जूनला होणार आहे. जेईई अॅडव्हान्समधील रँकिंगमुळेच आयआयटीमधील प्रवेशाची संधी खुली होणार आहे.
आयआयटी मुंबई, कानपूर, खरगपूर, रुरकी, मद्रास, दिल्ली आणि गुवाहाटीच्या पूर्वीच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा यापूर्वीच रद्द करण्यात आल्या असून या सर्व परीक्षा जेईई अॅडव्हान्सच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.
बीआयटीएसएटी(बीटसॅट) ची ऑनलाईन परीक्षा १४ मे ते १ जूनपर्यंत होणार असून त्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी आहे. बीटस् दुबई या परीक्षेसाठी कोणतीही प्रवेश परीक्षा नाही. जूनच्या तिसऱ्या आठवडय़ापासून ते जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहील. बिहार सीईटी दोन टप्प्यात होणार असून एप्रिलच्या तिसऱ्या आणि जूनच्या पहिल्या आठवडय़ात ही परीक्षा होईल. केवळ केरळच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली सीयुएसएटी सीएटी जूनच्या दुसऱ्या आठवडय़ातील रविवारी होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरणे जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ापासून सुरू होऊन ते फ्रेब्रुवारी २०१३पर्यंत राहील. डीसीई/डीटीयुसाठी प्रवेश परीक्षा होणार नाही. एआयईईईमधील रँकचा विचार करण्यात येणार आहे.
गोवा प्रवेश परीक्षा(जीसीईटी) ची माहिती पुस्तिकाविक्री मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ापासून सुरू होईल. त्यातही पदार्थविज्ञानची प्रवेश परीक्षा आठ मे रोजी सकाळी १० ते १२ होईल. रसायनशास्त्राची दोन ते दुपारी चापर्यंत होईल. तर गणिताची नऊ मे रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत होईल. अर्ज भरणे आणि ते जमा करण्याची प्रक्रिया एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत पूर्ण करायची आहे. जीयुजेसीईटी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात होणार असून या परीक्षेसाठीचे अर्ज भरणे आणि ते जमा करण्याचे काम डिसेंबर २०१२पर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब, जम्मु आणि काश्मिर यांच्याही तारखा घोषित करण्यात आल्या आहेत.

First Published on January 2, 2013 3:26 am

Web Title: more then sixty entrance exam of tecnical in india