आयोगाने आर्थिक व सामाजिक विकास या घटकाला पाचवे स्थान दिले आहे. या घटकात शाश्वत विकास, दारिद्रय़, सर्वसमावेशक विकास, लोकसंख्या शास्त्र, सामाजिक क्षेत्रांबाबतची धोरणे या उपघटकांचा समावेश केलेला आहे. या घटकात भारतीय अर्थव्यवस्था व वाणिज्य असा थेट उल्लेख नसला तरी आर्थिक विकास या संकल्पनेत त्याचा अंतर्भाव होणे हे समजून घेणे गरजेचे ठरते.
पंचवार्षिक योजना, व्यापार धोरणे, आयात निर्यात धोरणे, विकासांची प्रतिमाने, स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या ४०-४५ वर्षांतील भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा, १९९१ चे नवे आर्थिक धोरण, पहिल्या पिढीतील सुधारणा, दुसऱ्या पिढीतील सुधारणा, व्यापाराची दिशा हे घटक महत्त्वाचे ठरतात. जागतिक वसुंधरा परिषदेनंतर जागतिक राष्ट्रसमूहाने शाश्वत विकास म्हणजे काय? त्यासंदर्भात भारताची भूमिका अभ्यासणे गरजेचे आहे.
लोकसंख्या शास्त्र- दारिद्रय़ हे दोन्ही घटक पूरक आहेत. आतापर्यंत शासनाने जाहीर केलेली लोकसंख्याविषयक धोरणे, लोकसंख्या आयोग, जनगणना, जननदर, मृत्यूदर यांचा सूक्ष्मपणे अभ्यास करावा लागेल. दारिद्रय़ाच्या व्याख्या, ‘एडीएल’, ‘बीपीएल’चे निकष, सापेक्ष दारिद्रय़, निरपेक्ष दारिद्रय़, तेंडुलकर समिती, हशीम समिती, लकडावाला समिती, सक्सेना समितीच्या शिफारसी, शासनाच्या दारिद्रय़ निर्मूलनाविषयीच्या योजना, मानव विकास निर्देशांक या घटकांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या घटकांची तयारी करताना वर्तमानकाळातील घटकांशी सांगड घालणे गरजेचे ठरते.
आयोगाने पर्यावरणीय परिस्थिती, जैवविविधता, हवामान बदल या घटकालाही अभ्यासक्रमात स्थान दिले आहे. गेल्या दोन दशकांत जागतिक समूहाने पर्यावरणाची होणारी हानी व विकास यांच्या संदर्भात महत्त्वाची धोरणे, करार याबाबतीत सहमतीची भूमिका घेतलेली दिसते. त्या संदर्भात महत्त्वाचे करार उदा.- क्योटो प्रोटोकॉल, कार्टाजेना प्रोटोकॉल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, मिलेनियम डेव्हल्पमेंट गोल, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, रियो दी जिनेरो परिषद यांची माहिती असणे आवश्यक आहे.
या घटकांची तयारी करताना जागतिक तसेच भारतातील सद्यस्थितीत घडलेल्या घटकांवर विशेष भर दिला पाहिजे.
आयोगाने पेपर-१ मधील शेवटचा घटक म्हणून सामान्य विज्ञान या घटकाला स्थान दिले आहे. या घटकाची तयारी करताना विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना व त्यांचा उपयोजित उपयोग यावर भर देणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षाच्या नवीन अभ्यासक्रमात पेपर-१ मध्ये एकूण सात घटकांचा समावेश केलेला आहे. या घटकांची पूर्वतयारी करताना विद्यार्थ्यांनी ठोकळेबद्ध अभ्यासपद्धतीपेक्षा स्वत:ची विचारशक्ती व आकलन-क्षमतेचा पुरेपूर वापर करणे आवश्यक आहे.
पेपर-२ ची पूर्वतयारी व प्रश्नपत्रिकेचे बदलते स्वरूप याविषयीचे मार्गदर्शन उद्याच्या लेखात केले जाईल.
(क्रमश:)