‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे ऑक्टोबर, २०१२मध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल १४.६१ टक्के तर बारावीचा १९.०३ टक्के इतका लागला आहे. राज्याच्या नऊ विभागीय मंडळापैकी मुंबईचा दहावी-बारावी परीक्षेचा निकाल सर्वात कमी आहे.
दहावीचा सर्वाधिक कमी निकाल लातूर विभागाचा (९.२६ टक्के) असून त्या खालोखाल मुंबईचा (१० टक्के) आहे; तर सर्वात जास्त निकाल नाशिकचा (२४.९९) आहे. बारावीच्या निकालात २६.२८ टक्के इतका निकाल नोंदवित औरंगाबादने आघाडी घेतली आहे. त्या खालोखाल नाशिकचा २२.८१ इतका निकाल आहे. बारावीचा मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे १५.३४ टक्के इतका आहे.
मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातून १ लाख ७२ हजार ५४३ इतक्या विद्यार्थ्यांनी बारावीची तर २ लाख २० हजार ८०३ इतक्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी बारावीचे ३२ हजार ८३१ तर दहावीचे ३२ हजार २६९ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.