शिक्षण विभागात कारवायांचा सपाटा; अधिकारी- कर्मचारी दहशतीखाली

..पण वरिष्ठांचे काय?
अकरावीची शेवटची प्रवेश फेरी ऑफलाइन करण्यास शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पाठिंबा दर्शविला होता. मग या कारणावरून केवळ फडतरे यांना बळीचा बकरा करण्याचे कारण काय, अशा सवाल केला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शालेय शिक्षण विभागामध्ये कारवायांचे सत्र सुरू झाले असून त्यामुळे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी दहशतीखाली आहेत. त्यातच मुंबईचे आधीचे शिक्षण उपसंचालक एन.बी. चव्हाण यांच्या पाठोपाठ उपसंचालकपदाचा तात्पुरता कार्यभार वाहणाऱ्या आणि निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या भीमराव फडतरे यांच्यावर अचानक मंगळवारी निलंबनाची कारवाई झाल्याने कारवाईच्या फटकाऱ्यांमध्ये ‘ओल्यासोबत सुके’ही जळत असल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये व्यक्त होऊ लागली आहे.
सरासरी आठवडय़ाला एक याप्रमाणे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा सपाटाच सध्या आयुक्तांनी लावला आहे. त्यात फडतरे यांच्या नावाची भर पडली आहे. अकरावीचे ऑफलाइन प्रवेश राबविताना झालेले गोंधळ आणि शिक्षकांच्या मान्यतेबाबतच्या प्रकरणांचा ठपका ठेवून फडतरे यांच्यावर कारवाई केली गेली आहे. गेल्याच आठवडय़ात मुंबईचे माजी उपसंचालक एन. बी. चव्हाण यांनाही शिक्षक-शिक्षकेतरांच्या नेमणुका प्रकरणात आयुक्तांनी घरचा रस्ता दाखविला होता.
गेल्या काही महिन्यात पुणे, मुंबईबरोबरच इतरही काही विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेचे तत्कालीन संचालक, यापूर्वीचे पुण्याचे प्रभारी विभागीय उपसंचालक यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. पुण्यातील सहायक उपसंचालकांवरही निवृत्तीच्या तोंडावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. कारवाई होत असल्यामुळे शिक्षण विभागावर वचक बसला असला तरीही काही निर्दोष अधिकारीही यांत भरडले जात आहेत.
छोटय़ा-मोठय़ा चुकांसाठी समज देणे, कारणे दाखवा नोटिसा बजावणे, वेतनवृद्धी थांबविणे असे अनेक मार्ग आहेत. परंतु, थेट निलंबनाचीच कारवाई केली जात असल्यामुळे अधिकाऱ्यांना बदनामीला सामोरे जावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षण विभागांतील अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कार्यालयातील कर्मचारी, शिक्षण अधिकारी यांना एकत्र करून सर्वादेखत गाजावाजा करून कारवाई करण्यात येते. ही पद्धतही चुकीची असल्याची कुजबुज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आहे. अनेकदा क्षुल्लक अशा कारणांवरून अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला जात असल्याने विभागात नाराजीची भावना आहे.

मुंबईतील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची शेवटची फेरी परवानगी न घेता ऑफलाइन पद्धतीने राबविल्याने फडतरेंवर कारवाई झाली आहे. त्याचप्रमाणे शिक्षक मान्यतेच्या प्रक्रियेतही काही गैरप्रकार असल्याचे आढळून आले आहे. त्यातही फडतरे यांच्यावर संशय आहे. त्यांची विभागीय चौकशीही करण्यात येत आहे. मात्र, त्यामध्ये हस्तक्षेप होऊ नये किंवा कागदपत्रांमध्ये फेरफार होऊ नये म्हणून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
– पुरुषोत्तम भापकर,
शिक्षण आयुक्त