कुलगुरुपदाच्या निवड -प्रक्रियेदरम्यान खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्याविरोधात दाखल फौजदारी तक्रार महानगरदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी फेटाळून लावली.
ही तक्रार फेटाळण्याचे कारण आणि तपशीलवार निकाल नंतर देण्यात येणार आहे. डॉ. वेळुकर यांच्याविरोधात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या ए. डी. सावंत यांनी ही तक्रार महानगरदंडाधिकाऱ्यांकडे केली होती. कुलगुरूपदाच्या नियुक्तीसाठी १२ पात्रता अटी आहेत. त्यातील सात अटींमध्ये डॉ. वेळुकर पात्र ठरलेले नसतानाही त्यांची कुलगुरुपदी निवड करण्यात आली, असा सावंत यांचा आरोप आहे. निवड समितीलाही त्याची जाणीव होती, असाही आरोप सावंत यांनी तक्रारीत केला आहे. कुलगुरूपदाच्या नियुक्तीसाठी प्राध्यापक असणे, शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाला वाहिलेल्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध होणे करण्यासारख्या महत्त्वाच्या अटी आहेत. परंतु डॉ. वेळूकर यांनी त्याबाबत खोटी कागदपत्रे सादर केली. शिवाय १७१ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी झाल्याची तसेच अशा प्रकारच्या परिषदा आयोजित केल्याची खोटी माहिती आणि कागदपत्रेही त्यांनी सादर केल्याचा आरोप सावंत यांनी केला होता.
माहितीच्या अधिकाराअंतर्गत याबाबत मिळविलेल्या माहितीच्या आधारे सावंत यांनी डॉ. वेळुकरांविरुद्ध फसवणूक आणि खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.