जेईईमध्ये (सामाईक प्रवेश परीक्षा) सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या १००पैकी सर्वाधिक विद्यार्थ्यांची पसंती गेली अनेक वर्षे मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ला (आयआयटी) राहिली आहे; परंतु गेल्या तीन वर्षांत मुंबई-आयआयटीचा हा नावलौकिक कमी होत चालला आहे. त्याऐवजी दिल्ली-आयआयटीला पसंती देणाऱ्यांची संख्या वर्षांगणिक वाढते असल्याचे आढळून आले आहे.
जेईई ही अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीची सर्वाधिक कठीण परीक्षा समजली जाते. या परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल देशातील १६पैकी कुठल्या आयआयटीला आहे हा दरवर्षी औत्सुक्याचा विषय असतो. गेली अनेक वर्षे १०० पैकी जवळपास तीन चतुर्थाश विद्यार्थ्यांची पसंती मुंबईच्या आयआयटीला राहिली आहे; परंतु गेल्या तीन वर्षांत मुंबईला दिल्ली-आयआयटीचे आव्हान उभे राहत आहे. २०१२ला मुंबई-आयआयटीला १०० पैकी ७७ विद्यार्थ्यांनी पसंती दिली होती. गेल्या वर्षी ही संख्या ६७वर आली, तर यंदा ती ५८ वर आली आहे. याउलट दिल्लीची २०१२मध्ये १९ वर असलेली विद्यार्थिसंख्या ३६वर गेली आहे. पहिल्या ५० पैकी ४४ विद्यार्थ्यांनी मुंबईलाच पसंती दिली आहे. या जागा कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंगच्या आहेत, पण उर्वरित ५० पैकी १४ विद्यार्थ्यांनी मुंबईत प्रवेश घेतला आहे. याचाच अर्थ विद्यार्थी आता संस्थेच्या नावाऐवजी अभ्यासक्रमाला महत्त्व देऊ लागले आहेत, असे मुंबई-आयआयटीचे संचालक देवांग खक्कर यांनी सांगितले.
मुंबई-आयआयटीला कॅम्पस प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांची पसंती असते. याच कारणामुळे सुमारे दोन दशकांपूर्वी कानपूरला विद्यार्थी सर्वाधिक पसंती देत. मात्र, गेल्या १० वर्षांत चित्र पालटले असून मुंबईला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे, तर कानपूरला १००तले अवघे दोन ते तीन विद्यार्थी पसंती देऊ लागले आहेत; परंतु गेल्या तीन वर्षांत दिल्ली-आयआयटी अध्यापन आणि सुविधा या दोन्ही गोष्टींत दर्जेदार मानली जाऊ लागल्याने विद्यार्थ्यांचा या संस्थेकडील कल वाढू लागला आहे. दिल्ली-आयआयटी मुंबईच्या बरोबरीने प्रगती साधते आहे, याला काही इंग्रजी नियतकालिकांच्या सर्वेक्षणातही दुजोरा मिळाला होता. दक्षिणेकडील विद्यार्थी दिल्लीच्या तुलनेत मुंबईला अधिक पसंती देतात, तर उत्तरेकडील मुंबईऐवजी दिल्लीला पसंती देतात. दिल्लीच्या वाढत्या संख्येमागे जेईईत सर्वोत्तम यश मिळविणाऱ्यांमध्ये उत्तरेतील राज्यातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या हेदेखील कारण आहे.