खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील गैरप्रकार थांबविण्यासाठी आणि एकाहून अधिक प्रवेश परीक्षांचे विद्यार्थ्यांवरील दडपण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या देशस्तरावर एकच ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ (सीईटी) घेण्याच्या मोहिमेत आता मुंबईतील पालकही सहभागी झाले आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशस्तरावर घ्यावयाच्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या परीक्षेला पाठिंबा दर्शवू इच्छिणाऱ्या पालकांनी केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या ई-मेलवर पाठवावे, असे आवाहन ‘शिक्षण व्यापारीकरणविरोधी मंच’ या पालकांच्या संघटनेने केले आहे.
‘नीट’बाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक कारणावरून नुकताच रद्द ठरविला. याच परीक्षेच्या माध्यमातून देशभरातील सर्व सरकारी व खासगी संस्थांचेही प्रवेश करण्याचा प्रस्ताव होता. तसे झाले असते तर खासगी संस्थांमधील प्रवेशविषयक गैरव्यवहारांना बऱ्यापैकी आळा बसला असता. तसेच, एकाच अभ्यासक्रमां-साठी भाराभर प्रवेश परीक्षा देण्याच्या त्रासातून विद्यार्थ्यांची मुक्तता झाली असती. पण, न्यायालयाच्या निर्णयाने या सगळ्याला खो बसला आहे.
केंद्र सरकारने मात्र ‘नीट’बाबत ठाम भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाकडे फेरविचार करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. सरकारच्या या भूमिकेला पालकांनीही पाठिंबा दर्शवावा यासाठी संघटनेने ही मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार ‘वन नेशन, वन सीईटी’ या भूमिकेचे समर्थन करणारी ई-मेल पालकांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या azadg@sansad.nic.in या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन संघटनेच्या सचिव हेमा शिर्के यांनी केले आहे.