इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एक्झामिनेशन्सतर्फे (आयसीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यातूनच नव्हे तर भारतातून पहिला येण्याचा मान पाल्र्यातील छत्रभूज नरसी मेमोरिअल शाळेचा विद्यार्थी प्रिय शाह याने पटकावला आहे. त्याने ९८ टक्के मिळवून ही कामगिरी केली आहे.
प्रियने विज्ञानात १००पैकी ९७ तर गणितात ९९ गुणांची कमाई केली आहे. प्रिय पाठोपाठ पाल्र्यातीलच अंकिता बोहरा या जमनाबाई नरसी शाळेच्या विद्यार्थिनीने ९७.९ टक्क्य़ांची कमाई करत अव्वल कामगिरी केली आहे. अंकितालाही प्रियप्रमाणे अभियांत्रिकीमध्ये करिअर करायचे आहे. गेल्या वर्षीही पाल्र्यातीलच
दोघा विद्यार्थ्यांनी या परीक्षेत देशातून अव्वल येण्याची कामगिरी केली
होती.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या या परीक्षेला महाराष्ट्रातून १२,९६२ विद्यार्थी बसले होते. देशभरातून १८४१ शाळांमधील १,४९,०८७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९८.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर महाराष्ट्राचा निकाल ९९.६४ टक्के इतका आहे. हा एक प्रकारचा विक्रम आहे. महाराष्ट्रातून केवळ ४७ विद्यार्थी यंदा अनुत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात आयसीएसईच्या एकूण १५५ शाळा आहेत. एकूण ६६ विषयांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.

विश्वासच बसला नाही
मी खूप परिश्रमपूर्वक अभ्यास केला होता. त्यामुळे किमान शाळेत तरी मी पहिला येईन, याची खात्री मला होती. मला जेव्हा मी देशभरातून पहिला आल्याचे समजले तेव्हा प्रथम माझा विश्वासच बसला नाही. माझ्या नावाचा कुणी वेगळाच विद्यार्थी असावा असे मला वाटले. पण, वारंवार माझा निकाल तपासल्यानंतर कुठे माझ्या लक्षात आले की मी माझ्या आई-वडिलांना किती उत्कृष्ट भेट दिली आहे.
    – प्रिय शहा (९९टक्के)

परिश्रमांना गोड फळ
माझ्या यशाचे सर्व श्रेय मला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणाऱ्या माझ्या आईवडिलांना आहे. मी खूप परिश्रम घेतले होते. माझ्या या श्रमांना खूप गोड फळ आले आहे.
अंकिता बोहरा (९७.९ टक्के)