मुंबई विद्यापीठ आणि तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ३१ मे ते २ जून या कालावधीत एका करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कालिना संकुलात हा उपक्रम घेण्यात येणार आहे. याचे उद्घाटन ३१ मे रोजी सकाळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. एस. एस. मंथा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव संजीवकुमार हेही उपस्थित राहणार आहेत.  १ व २ जून रोजी विविध चर्चासत्रे होणार असून यात आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे, कुलगुरू राजन वेळूकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे, आयसीटीचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, डॉ. माणिकराव साळुंखे, संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले आदी तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत, असे विद्यापीठ कल्याण विभागाचे संचालक डॉ. मृदुल निळे यांनी सांगितले.

ठळक वैशिष्टय़
३१ मे : अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, औषधशास्त्र व आयटीआय आदी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांंसाठी खास मार्गदर्शन व दुपारच्या सत्रात एमबीए, एमसीए, आरोग्य विज्ञान आदी अभ्याक्रमांबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. सु. का. महाजन, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांचे मार्गदर्शन. तसेच संकुलात विविध विभागाच्या शिष्यवृत्ती, अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया आदी विषयांची माहिती पुरवणारे ५० नामांकित संस्थांचे स्टॉल्स.