विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण रुजविण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीचे निमित्त साधून सोमवार, १४ जानेवारी रोजी युवा दिन साजरा करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील क्रीडा संकुलात दिवसभर होणाऱ्या या कार्यक्रमात मान्यवरांची व्याख्याने आणि पोस्टर प्रदर्शन यांचा समावेश असेल.
या कार्यक्रमासाठी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ग्रामीण भागांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी शहरातील ५० निवडक महाविद्यालयांकडे सोपविण्यात आली आहे. सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन होईल.
त्यानंतर शिक्षण, रोजगार आणि मूल्ये या विषयावरील पहिल्या सत्रात विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिनेश सिंग विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ‘समाज सबलीकरण आणि माध्यमे’ या विषयावरील सत्रात पत्रकार राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, राजू हिरानी आणि मुकेश शर्मा सहभागी होतील. शेवटच्या सत्रात ‘सेवेसाठी राजकारण’ या विषयावर खासदार संजय राऊत, आमदार जितेंद्र आव्हाड, देवेंद्र फडणवीस, नितीन सरदेसाई सहभागी होतील.
कार्यक्रमाचा समारोप गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत होईल. वाहतूकविषयक प्रश्नांवर ते विद्यार्थ्यांशी बोलतील, अशी माहिती कुलगुरु राजन वेळुकर  यांनी दिली आहे.