सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या औट घटकेच्या दिलाशामुळे आपले मुंबई विद्यापीठात डळमळीत झालेले आसन सावरण्यात कुलगुरू राजन वेळूकर यांना यश आले असले तरी त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळी कारभार सावरण्याची चिन्हे नाहीत. कारण, यावेळी विद्यापीठाने आपल्या विविध विभागांमधून आणि संलग्नित महाविद्यालयांतून कला शाखेत पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा ‘एमए’चा तिसऱ्या सत्राचा निकाल रखडविला आहे.
आपल्या खुर्चीवर पुन्हा एकदा विराजमान झाल्यानंतर वेळुकर यांनी परीक्षा विभागाचे घोळ तातडीने निस्तरू, असे जाहीर केले होते. परंतु, स्वत:चे आसन सावरण्यातच अधिक व्यस्त असलेल्या कुलगुरूंना विद्यापीठातील या संवेदनशील विभागाचा कारभार दुरूस्त करण्याइतकी फुरसत झालेली दिसत नाहीत. एमएचा रखडलेला निकाल हे याचेच द्योतक आहे.
विभागाच्या या नादुरुस्त कारभारामुळेच ‘एमए’ची चौथ्या आणि शेवटच्या सत्राची परीक्षा तोंडावर आली तरी आधीच्या सत्र परीक्षेच्या निकालाचा पत्ता नाही. एमएच्या काही विषयांची परीक्षा एप्रिलपासून सुरू होते आहे. ही परीक्षा महिनाभरावर आली तरी आधीच्या परीक्षेचा निकाल नसल्याने विद्यार्थी मात्र चांगलेच हवालदील झाले आहेत.नोव्हेंबर-डिसेंबर, २०१४मध्ये ‘एमए’च्या विविध विषयांच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षा पार पडल्या. याचा निकाल परीक्षा होऊन ४५ दिवस उलटले तरी जाहीर झालेला नाही. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षेचा निकाल जास्तीत जास्त ४५ दिवसांत जाहीर करणे बंधनकारक आहे. आता या विद्यार्थ्यांच्या चौथ्या सत्राची परीक्षा तोंडावर आली आहे. समजा यात एखादा विषय राहिला तर आम्ही फेरपरीक्षेचा अर्ज कधी भरायचा, अशा या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे.

परीक्षा सुरू झाल्यानंतर ‘प्रवेशपत्रे’
केवळ एमएच्याच नव्हे तर टीवायबीएससीच्या शेवटच्या सत्राची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही विद्यापीठाच्या गोंधळी कारभाराचा फटका सहन करावा लागला आहे. या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा १९ मार्चला सुरू झाली. परंतु, त्यांची परीक्षेची प्रवेशपत्रे (हॉलतिकीट) परीक्षा सुरू झाल्यानंतर म्हणजे २० मार्चला महाविद्यालयांमध्ये आली. वास्तविक गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांच्या हातात प्रवेशपत्रे पडायला हवी होती. परंतु, परीक्षेशी संबंधित सर्व व्यवहार ऑनलाइन करून घेणारे पहिले विद्यापीठ अशा फुशारक्या मारत मंत्रालयात आपली पाठ थोपटून घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाला परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची साधी प्रवेशपत्रेही देता आली नाही, हे वास्तव आहे.

ही दुसरी खेप
गेल्या वेळेस एमए, एमएससी, एमकॉम अशा विविध विद्याशाखांचे दुसऱ्या सत्राचे निकाल विद्यापीठाने रखडवले होते. तेव्हाही पुढच्या सत्राच्या परीक्षांचे अर्ज भरण्याची मुदत संपण्यास एक-दोन दिवस असताना निकाल जाहीर केला गेला होता. त्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांना त्यांची चूक नसताना ५०० रूपये विलंब शुल्क भरून परीक्षांचे अर्ज भरावे लागले होते. यावेळेसही विद्यापीठ हाच कित्ता गिरवणार का, असा प्रश्न एका हतबल विद्यार्थ्यांने केला. या संबंधात परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याच्या वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.