एमएच्या मानसशास्त्र विषयाच्या ३० हून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनही एकाच विषयात अनुपस्थित दाखविण्याची विद्यापीठाची करामत ताजी असतानाच कीर्ती महाविद्यालयातील बीएच्या शेवटच्या वर्षांच्या पाच विद्यार्थ्यांच्या बाबतीतही हेच घडले. या प्रकरणातून पुन्हा एकदा तांत्रिकदृष्टय़ा प्रगत होत असलेल्या विद्यापीठाच्या ‘तंत्रशुद्ध’ कारभार समोर आला आहे.
कीर्ती महाविद्यालयातील या पाच विद्यार्थ्यांना परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात परीक्षा केंद्र आले होते. या पाचही विद्यार्थ्यांनी १३ नोव्हेंबर रोजी एक्स्पोर्ट मॅनेजमेंट या विषयाची परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांचा निकाल ४५ दिवसांच्या आत लागणे तर सोडाच तो एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात जाहीर झाला. त्या वेळेस या पाचही विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखविण्यात आल्याचे समोर आले. महाविद्यालयाच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी महर्षी दयानंद महाविद्यालयातून त्यांच्या उपस्थितीचा पुरावा आणला आणि परीक्षा विभागाला या संदर्भात अर्ज केला. त्या वेळेस परीक्षा विभागाने याकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांना तुम्हा आता ऑक्टोबर २०१५मध्ये परीक्षा द्या असा सल्ला दिला. अखेर विद्यार्थ्यांनी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांची भेट घेऊन त्यांना हा प्रश्न सांगितला. त्या वेळेस त्यांनी परीक्षा विभागात जाऊन या विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्याची मागणी केली. त्या वेळेस विभागातील माहितीनुसार या विद्यार्थ्यांचे त्या संबंधित विषयाचे गुण त्यांना सांगण्यात आले. यातील काही विद्यार्थी उत्तीर्णही झाले आहेत. म्हणजे उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे प्रकार वारंवार समोर येत आहे. विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांची काळजी नसल्याचा आणखी एक पुरावा या प्रकरणातून समोर आल्याचे तांबोळी यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाने निकाल ऑनलाइन जाण्यापूर्वी त्याची फेरतपासणी करणे आवश्यक आहे. वारंवार होणाऱ्या चुकांमधून तरी विद्यापीठाने काहीतरी शिकावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.