मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘बुक्टू’नेही डॉ. नीरज हातेकरांच्या निलंबनाला विरोध दर्शविला आहे. डॉ. हातेकर यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला त्यामुळे मोठे पाठबळ मिळाले असून कुलगुरू राजन वेळुकर यांच्या कारभाराविरोधातील नाराजी आणखी वाढणार आहे.
‘बॉम्बे युनिव्‍‌र्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स युनियन’ (बुक्टू) ही मुंबई विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमधील शिक्षकांची सर्वात मोठी संघटना आहे. डॉ. हातेकर यांच्यावरील कारवाई बेकायदेशीर आणि अयोग्य असून नैसर्गिक न्यायाला धरून नाही, अशी टीका बुक्टूने केली.
व्यवस्थापन परिषदेच्या ज्या बैठकीचा आधार घेत कुलगुरूंनी हातेकरांवर कारवाई केली होती, त्या बैठकीला बुक्टूच्या एक प्रतिनिधी डॉ. मधू परांजपे देखील उपस्थित होत्या. हातेकरांवरील कारवाईचा प्रस्ताव या बैठकीत जेव्हा चर्चेला आला तेव्हा डॉ. परांजपे यांनी त्याला विरोधही केला होता. मुळात या कारवाईचा प्रस्ताव हा बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर नसताना चर्चेला आणण्यात आला होता.
हातेकर यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी न देता त्यांच्यावर थेट कारवाई करणे चुकीचे आहे, असे मतही यावेळी डॉ. परांजपे यांनी व्यक्त केले. पण, तरीही कुलगुरूंनी कारवाईचा विषय पुढे रेटत आणि विशेषाधिकारांचा वापर करत डॉ. हातेकरांच्या निलंबनाचे आदेश काढले.
डॉ. हातेकरांविरोधातील कारवाई विद्यापीठाने त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी बुक्टूने केली आहे. डॉ.हातेकर यांनी केलेली टीका कुलगुरूंनी सकारात्मकपणे घ्यावी आणि तब्बल १५६ वर्षांची परंपरा असलेल्या या भारतातील सर्वाधिक जुन्या विद्यापीठाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि व्यवस्थापकीय घडी बसविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन बुक्टूचे अध्यक्ष सदाशिवन यांनी केले आहे.

‘आम आदमी’चाही पाठिंबा
महाराष्ट्रातील आम आदमी पक्षानेही या कारवाईचा निषेध करून त्यांचे निलंबन तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. डॉ. हातेकरांवरील कारवाई आकसापोटी करण्यात आली असून त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही उभे राहू, असे पक्षाने स्पष्ट केले.

प्रा. हातेकर हे उत्तम शैक्षणिक कामगिरी असलेले प्राध्यापक आहेत. त्यांच्या कामाविषयी मला अत्यंत आदर आहे. या कारवाईविरोधात विद्यार्थी व शिक्षक मोठय़ा संख्येने एकत्र आले आहेत, ही आश्वासक घटना आहे. महाराष्ट्र हे उदारमतवादी व बुद्धीवादी विचारांची परंपरा असलेले राज्य आहे. मुंबई विद्यापीठाने ही परंपरा कुंठीत करण्याऐवजी तिचा मान राखला पाहिजे.
    – रामचंद्र गुहा, प्रसिद्ध इतिहासकार