अपुऱ्या शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे वादग्रस्त ठरलेल्या शीवच्या ‘वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालया’ची संलग्नता अंशत: काढून घेण्याबाबत विचार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्वत सभेने आणखी एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
या महाविद्यालयाविरोधात आलेल्या तक्रारींमधील तथ्य तपासण्यासाठी मुंबई विद्यापीठाने प्राचार्याची एक त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने महाविद्यालयाची मान्यता काढण्याची शिफारस विद्यापीठाला सादर केलेल्या अहवालात केली आहे. त्यावर विद्वत सभेत सोमवारी जोरदार चर्चा झाली. महाविद्यालयाची मान्यता काढण्याचा आग्रह अनेक सदस्यांनी या वेळी धरला, तर काही सदस्यांनी याला विरोध दर्शवून महाविद्यालयाला एक संधी देण्याची भूमिका मांडली. त्यानंतर या महाविद्यालयाची मान्यता अंशत: काढून घेण्याचा तोडगा काढण्यात आला. यासाठी प्रा. विजय जोशी, प्रा. आत्माराम वंजारी, प्रा. सुरेश उकरंडे यांची त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीला आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी थांबविणे, त्यांच्या परीक्षा न घेणे अशा मार्गानी या महाविद्यालयाची संलग्नता अंशत: काढून घेण्याबाबत ही समिती विचार करेल.