राज्यपाल आणि कुलपती विद्यासागर राव यांनी गुरुवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. वेळुकर यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या पाश्र्वभूमीवर राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे.
वेळुकर यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने त्यांची पात्रता निकषांनुसार निवड झाली आहे किंवा नाही हे तपासण्याचे आदेश शोध समितीला दिले हेते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला अनुसरून राज्यपालांनी वेळुकर यांना कामावरून दूर राहण्याचे आदेश दिले होते. पुढील निर्णय होईपर्यंत प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांच्याकडे कुलगुरूपदाचा कार्यभार सोपवला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात वेळूकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी रोजी या निर्णयाला स्थगिती दिली. तेव्हापासून वेळुकर पुन्हा कामावर रूजू होणार का याबाबत विद्यापीठात चर्चा रंगू लागल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ३ मार्च रोजी वेळुकरांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत हाती पडल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे राज्यपालांनी स्पष्ट केले.  ५ मार्च रोजी राज्यपालांनी वेळुकर यांना पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे राजभवनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. शुक्रवारी धुलिवंदनाची सुट्टी असल्यामुळे वेळूकर शनिवारी पुन्हा आपल्या कामावर रुजू होणार आहेत.

सर्वोच्च न्यायालय आणि कुलपतींच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. या निर्णयामुळे केवळ राजन वेळुकर आणि मुंबई विद्यापीठालाच फायदा होणार नसून विद्यापीठाच्या शोध समितीलाही फायदा होणार आहे. कुलगुरूपदाची मान, मर्यादा आणि सन्मान राखण्यासही मदत होणार आहे. वेळुकर यांच्याबाबत यापूर्वी उच्च न्यायालय व राज्यपालांनी दिलेल्या आदेशासंदर्भात माहिती देण्यासाठी राज्यापालांच्या आदेशानुसार प्रभारी कुलगुरूंनी ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली विद्वत आणि व्यवस्थापन परिषदेची संयुक्त बैठक राज्यपालांच्या सुधारीत आदेशानुसार रद्द करण्यात आली.
– डॉ. एम. ए. खान, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ