विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनात गुरुवारी अधिकारी संघटनाही सहभागी झाल्यामुळे विद्यापीठाचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. हे आंदोलन असेच सुरू राहिल्यास २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वैद्यक विद्याशाखांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाच्या स्थापनेला सुमारे १५ वर्षे उलटूनही कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संबंधित अनेक प्रश्न सोडविले गेले नाहीत. या मुद्दय़ावरून शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने चार दिवसांपासून छेडलेल्या आंदोलनास अधिकारी संघटनेने पाठिंबा दिला. परिणामी, विद्यापीठाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला. महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करणे, २००५ पूर्वी सेवेत दाखल झालेल्यांना निवृत्तिवेतन योजना लागू करणे आणि त्यानंतर रुजू झालेल्यांना भविष्य निर्वाह निधी व अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू करणे, ४५६ पदांना मान्यता देणे आदी प्रलंबित मागण्यांविषयी आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली जात नसल्याचा आरोप शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक शेळके यांनी केला.  राज्यातील विविध वैद्यक शाखांची हिवाळी परीक्षा २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. विद्यापीठात अधिकारी व कर्मचारी नसल्याने परीक्षांचे वेळापत्रक कोलमडून पडेल, याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले आहे. त्याचा फटका परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या राज्यातील एक लाख विद्यार्थ्यांना बसू शकतो. या शिवाय, विद्यापीठामार्फत नोव्हेंबरच्या अखेरीस क्रीडा महोत्सवाचेही आयोजन केले जाणार आहे. त्याच्या नियोजन प्रक्रियेत आंदोलनामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा संघटनांनी दिल्यामुळे हा प्रश्न चिघळणार असल्याचे दिसत आहे.